महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे राज्याच्या महसूल सचिवांचे लक्ष वेधणार..
कुडाळ : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे गुजराती परप्रांतीय एका कंपनीने तेथील काही ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी सरकारी यंत्रणांना हाताशी धरून जमीन घेतले आहेत. त्याविरोधात ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आवाज उठवीत २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग तहसील कार्यालय येथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पाठींबा दिला आहे. तसेच या जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्याच्या महसूल सचिवांची भेट घेऊन महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे सचिवांचे लक्ष वेधले जाणार आहे. महसूल विभागाने बेकायदेशीर केलेल्या नोंदी, बेकायदेशीर दिलेल्या अकृषिक सनदा रद्द करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
