क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी केली शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
*💫मालवण दि.११-:* कोरोनामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाल्यास त्यांना न्याय मिळेल, अशी मागणी क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. अनेक संघटना आणि पालक, खेळाडू, शिक्षक, प्रशिक्षक यांच्या क्रीडा गुण सवलत नियमावलीची तरतूद यावर्षी रद्द करून खेळाडूंच्या पूर्व प्राविण्य कामगिरीवर आधारित गुणांकन करून क्रीडा गुण सवलत देण्याची योजना राबवावी, अशी विनंती शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मात्र, शिक्षण विभाग व शिक्षण मंडळ यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतेही निवेदन करण्यात आलेले नाही. २३ एप्रिलपासून बोर्ड परीक्षा सुरू होत असून अजूनही खेळाडूंचे क्रीडा गुण प्रस्ताव सादर करण्याची कारवाई सुरू झालेली नाही. दहावी व बारावीमधील विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा गुण सवलत प्राप्त करण्यासाठी त्या वर्षीच्या (म्हणजे २०२०-२१) शैक्षणिक सत्रात किमान प्राथमिक स्पर्धेत सहभागी होणे नियमानुसार आवश्यक आहे. तसे प्रमाणपत्र सुद्धा प्रस्तावास जोडावे लागते. मात्र, कोविड १९ च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सत्र २०२०-२१ मध्ये शालेय वा संघटनेच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनच करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला यावर्षी २०२०-२१ मध्ये शालेय वा संघटनेच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधीच मिळालेली नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियमातील कलम क्रमांक १९ म मधील परीक्षांबाबत तरतुदी या वर्षीसाठी तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय करून नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना चिंतामुक्त केले आहे. त्याच धर्तीवर दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसलेल्या खेळाडूंनाही क्रीडा गुण नियमावलीतील अट क्रमांक ४ रद्द करून पूर्व प्राविण्यावर आधारित क्रीडा गुण देण्यासाठी शासनाद्वारे कार्यवाही करावी, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
