रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ऍप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार…

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची ग्वाही..

मालवण
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यासायिकांना संघटित करून त्यांच्या ऑनलाईन व्यवसाय वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ऍप सुरु करण्याचे ठरविले असून यासाठी सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेऊन शासन, व्यावसायिक, पर्यटन महासंघाच्या समन्वयाने ऍप चालल्यास जिल्ह्यात परिवहन पर्यटन क्षेत्रात योग्य मार्ग बनेल, अशी भूमिका मांडण्यात आली. याबाबत रिक्षा व्यवसायिकांची बैठक घेऊन सदर ऍप साठी पर्यटन महासंघास सहकार्य करू, असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन २८ वर्षे पूर्ण होऊनही जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटन वाढीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही रिक्षा व्यावसायिकांची असूनही ऑनलाईन मार्केटिंग क्षेत्रात रिक्षा व्यावसायिक मागे राहिल्याने परवानाधारक रिक्षा व्यावसायिक पर्यटन व्यवसाया पासून दुरावल्याच्या स्थितीत आहे. याचाच विचार करून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा व्यावसायिक ऑनलाईन ऍप च्या माध्यमातून नोंदणीकृत केल्यास जिल्ह्यात पर्यटनासाठी भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांसाठी व्यावसायिकांचे नंबर उपलब्ध होऊन येणाऱ्या पर्यटकांना परिचित, अपरिचित पर्यटन स्थळे पाहण्याचे नियोजन करता येईल तसेच पर्यटन स्थळ दरपत्रकही उपलब्ध होईल व सुरक्षित प्रवासाचे माध्यम उपलब्ध होऊन जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होणारी आहे अशी माहिती अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी यावेळी दिली.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी पर्यटन महासंघाच्या या उपक्रमाच्या माहितीसाठी रिक्षा संघटना, अन्य परवानाधारक वाहतूक व्यावसायिकांची चालू आठवड्यात आपल्या दालनात ओरोस येथे बैठक आयोजित करून यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विष्णू मोंडकर यांच्यासह पर्यटन व्यावसायिक महासंघाचे सोशल मीडिया अध्यक्ष किशोर दाभोलकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, कार्याध्यक्ष रविंद्र खानविलकर, महासंघाचे मालवण शहराध्यक्ष मंगेश जावकर, रामा चोपेड़ेकर, मिलिंद झाड़, मनोज खोबरेकर, दर्शन वैंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page