मच्छिमार नेते छोटू सावजी व दिलीप घारे यांचा इशारा
⚡मालवण ता.१४-: कोरोना काळानंतरही राज्याच्या जलदीक्षेत्रात सातत्याने घटत्या मत्स्यसाठ्यांमुळे मत्स्य दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत शासनाकडे मागणी करूनही केराची टोपली दाखवली जात आहे. तसेच समुद्रात अनधिकृत मासेमारी सुरूच असून याबाबत मत्स्य व्यवसाय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी सध्या निवडणूक हंगामाच्या तयारीला लागले आहेत, काहीच महिन्यात राज्याच्या निवडणुका होणार आहेत मच्छीमारांच्या क्षेत्रातील अनधिकृत मासेमारीवर योग्य कारवाई न झाल्यास मत्स्य व्यवसाय विकास धोरणानुसार स्थानिकांचा सहभाग आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याबाबतचा विचार करावा, लागेल असा इशारा सिंधुदुर्ग श्रमजीवी रापण संघ आणि मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघ यांच्या वतीने छोटू सावजी आणि दिलीप घारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गेले सहा वर्षे सातत्याने ग्लोबल वार्मिंग, अवेळी पडणारा पाऊस, जोरदार वाहणारे दक्षिणोत्तर वारे, वादळी हवामान, सतत खवळलेला समुद्र या नैसर्गिक कारणांमुळे मासेमारीचा जवळपास दोन महिने हंगाम वाया जात आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमारांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणाऱ्या प्रजातींच्या मासेमारी पासून मुकावे लागत आहे. गेली पाच वर्षे सातत्याने नैसर्गिक लहरीपणामुळे गणेश चतुर्थी नंतरच खऱ्या अर्थाने मासेमारी हंगामाला सुरुवात होत आहे. यामुळे गणेश चतुर्थीचा सण उसनवारी ने साजरा करावा लागत आहे. यंदाच्या मत्स्यहंगामाला सुरुवात झाली असून न्हय, ट्रॉलिंग रापण, तियानी या प्रकारच्या मासेमारीला कर्मठ महाकुल बांगडा बाळा पापलेट आधी मासळी मिळत आहे. मात्र याचा सुगावा एलईडी धारक मच्छिमारांना लागताच गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दिवस-रात्र दहा ते बारा गावच्या जलधीक्षेत्रात गोवा, कर्नाटक, गुजरात, मुंबई, रत्नागिरी येथील अनेक अनधिकृत एलईडी धारक नौकांचा हैदोस सुरु झाला आहे. नैसर्गिक स्थिती सुधारली तरी कायद्याने बंदी असलेल्या या अनधिकृत मासेमारीचा सुळसुळाट सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर जोमाने सुरू आहे. त्यांच्या कडून शासनाच्या डोळ्या देखत मासळीची लयलूट सुरु असून यासारखे स्थानिक मच्छिमारांचे दुदैव नाही. स्थानिक मत्स्य व्यवसाय विभागाकडे वस्ती नौका उपलब्ध नाही, स्थानिक मत्स्य व्यवसाय विभाग वरिष्ठ कार्यालयावर बोट ठेवून स्थानिक मच्छीमारांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत आहे, अशी टीका सावजी व घारे यांनी केली आहे.
परराज्यातील अनधिकृत मासेमारी बरोबरच जिल्ह्यातील काही धनदांड्या लोकांनी सुरू केलेली बेकायदेशीर मिनी पर्ससीन एलईडी मासेमारी देखील होत आहे. संसदीय लोकप्रतिनिधी मत्स्यव्यवसाय विभाग स्थानिक लोकप्रतिनिधी अशा मासेमारीवर कारवाई करण्याबाबत सुतोवाच करतात, मात्र आश्वासनाखेरीज प्रत्यक्ष अंमलबजावणी अथवा कोणतीही कारवाई होत नाही. या अनधिकृत मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभाग जाणून बुजून कारवाई करत नाही. बेकायदेशीर मच्छिमारीला लोकप्रतिनिधी व शासनाचा वरदहस्त आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांची गत “आ बैल मुझे मार” अशी झाली आहे. शासनाला याचे सोयर सुतक नाही, त्यामुळे येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत पारंपारिक मच्छिमारांना विचार करावा लागेल, असा इशारा छोटू सावजी व दिलीप घारे यांनी दिला आहे.
