मालवण, दि प्रतिनिधी
गुरे चरविण्याच्या विषयावरून झालेल्या वादात संतोष गोठणकर यांच्या डोक्यात कोयता मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी सखाराम गोसावी, संदेश गोसावी या पिता पुत्रांची येथील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपींच्या वतीने ॲड. सुमित जाधव यांनी काम पाहिले.
मालवण तालुक्यातील वडाचापाट – थळकरवाडी येथील संतोष दत्ताराम गोठणकर हे ३० ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची गुरे चरविण्यासाठी गेले असता संशयित आरोपी सखाराम लक्ष्मण गोसावी व संदेश सखाराम गोसावी यांच्यात वाद झाला. यात सखाराम गोसावी यांनी संतोष गोठणकर यांच्या डोक्यात कोयता मारून दुखापत केली. याप्रकरणी श्री. गोठणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दोघांविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संशयित आरोपींच्या वतीने ॲड. सुमित जाधव यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील झालेल्या सुनावणीत संशयित आरोपींच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी दोन्ही संशयित आरोपींची अटी, शर्ती घालत जामिनावर मुक्तता केली आहे.
