⚡मालवण ता.०५-:
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी काल कल्याण येथून अटक केल्यानंतर आज मालवण न्यायालयात हजर केले असता याप्रकरणी सरकारी पक्षाचे वकील व आरोपीच्या वकिलांकडून झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आपटे याला १० सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी आधीपासून पोलीस कोठडीत असलेला दुसरा आरोपी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याची आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यालाही १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
जयदीप आपटे याला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील ऍड. तुषार भणगे यांनी दिली. तर पुतळा दुर्घटनेवेळी कोणतीही जीवितहानी झालेली नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चुकीची तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून आपटे याच्यावर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, सर्व तपासण्या करूनच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले अशी बाजू आपटे यांचे वकील ऍड. गणेश सोवनी यांनी मांडली आहे.
