पळून गेलेला एलईडी गुरुवारी रात्री पुन्हा मालवण बंदरात प्रगटला…

मात्र, जनरेटर, साहित्य गायब; कारवाईच्या भीतीने पळून गेल्याचे खलाशाची माहिती

मालवण (प्रतिनिधी) मत्स्य विभागाने पकडलेला रत्नागिरी येथील ‘एच अताउल्ला’ हा एलईडी टॉलर आठवडाभरापूर्वी मालवण बंदरातून पळून गेला असताना गुरुवारी मध्यरात्री पुन्हा हा ट्रॉलर मालवण बंदरात प्रकट झाला. या टॉलरची पाहणी आज सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकारी व पोलिसांनी केली असता टॉलर वरील महागडा जनरेटर व काही साहित्य गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर टॉलरवरील तांडेल व खलाशांची पोलिसांनी चौकशी केली असता आपल्यावर मत्स्य विभाग व पोलीस कारवाई करतील या भीतीने आपण पळून गेलो आपल्याला पळून जाण्यास कोणीही मदत केलेली नाही असे सांगितले. यामुळे पळून गेलेल्या रात्री तो बुरखाधारक कोण ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने पकडून मालवण बंदरात अवरुद्ध करून ठेवलेला रत्नागिरी साखरीनाटा येथील अबुझर ए रौफ हबीब यांच्या मालकीचा ‘एच अताउल्ला’ हा टॉलर शुक्रवारी २ एप्रिल रोजी मत्स्य विभागाच्या सागरी सुरक्षा रक्षकाच्या समोरूनच पळून गेला होता. या टॉलरवर काही स्थानिक बुरखाधारी इसमाने तांडेल व खलाशांच्या मदतीने पळून जाण्यास यश मिळवले होते. मत्स्य विभागाने पकडलेला टॉलर अचानक गायब झाल्याने सागरी सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली होती. असे असताना आठ दिवसानंतर पळून गेलेला टॉलर पुन्हा प्रकट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या एलईडी टॉलर वरील तांडेल अनिल फारवी, बलाराम इक्का, चिरंजीवी मिश्रा या खलाशांची मालवण पोलिसांनी चौकशी केली असता खलाशांनी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने आपण पळून गेल्याचे सांगितले. पंचनाम्यातील तो महागडा जनरेटर गायब मालवण बंदरातून पळून गेलेल्या रत्नागिरी साखरीनाटा येथील ‘एच अताउल्ला’ या एलईडी टॉलरवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या पंचनाम्यात त्या टॉलरवरील महागड्या जनरेटरची नोंद होती. मात्र आज मत्स्यव्यवसाय विभागाने टॉलरवर केलेल्या पाहणीत तो महागडा जनरेटर गायब असल्याचे निदर्शनास आले. रत्नागिरी साखरीनाटा येथील पळून पुन्हा आलेल्या त्या एलईडी टॉलरवरील तांडेल व खलाशांची मालवण पोलिसांनी चौकशी केली असता आपण स्वतः कारवाईच्या भीतीने पळून गेलो आपल्याला कोणीही मदत केली नसल्याचे पोलिसांना सांगितले यामुळे तो स्थानिक बुरखाधारी कोण याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर एलईडी टॉलर पळून नेण्यासाठी तांडेल व खलाशांना सहकार्य करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मत्स्य विभागाकडे केली आहे.

You cannot copy content of this page