हरी खोबरेकर यांचे ठाकरे शिवसेना बैठकीत रोखठोक प्रतिपादन..
⚡मालवण ता.३०-: ठाकरे शिवसेनेचे नेते खास. संजय राऊत यांच्या उपस्थितीत मालवण कोळंब येथे झालेल्या पदाधिकारी बैठकीत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आक्रमक भाषण करत राजकोट येथील राड्यावरून भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. राजकोट येथील घटनेत शिवसैनिक व महिला रणरागिणी या गुंडांशी वाघाप्रमाणे लढल्या, त्यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आदेश दिला असता तर क्षणार्धात त्या कार्यकर्त्यांच्या गुटल्या करून समुद्रात फेकून दिले असते, असे रोखठोक वक्तव्य केले.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, राजकोट येथील घटनेत आदित्य ठाकरे म्हणाले असते कि मला हे साफ करून पाहिजे, तर क्षणार्धात त्यांच्या गुटल्या करून समुद्रात फेकले असते, एवढी ताकद त्यावेळी शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली होती. किती वेळा अन्याय सहन करायचा, किती दहशत सहन करायची, कितीवेळा राजकीय वार सहन झेलायचे ? अरे काय तुम्ही आम्हाला घरात घुसून मारणार ? आम्ही घरातले नाही तर रस्त्यावर फिरणारे वाघ आहोत, कुठे यायचे ते सांगा, आम्ही हजर राहू, असे आव्हान हरी खोबरेकर यांनी देतानाच घरातून येणारा प्रत्येक शिवसैनिक “आलो तर तुमचा नाहीतर बाळासाहेबांचा” हेच सांगून येतो, असे सांगितले.
