नारायण राणे यांची राडा संस्कृती पाहून त्यांच्या मतदारांना आता पश्चाताच होतोय…

हरी खोबरेकर:राजकोट येथे झालेल्या प्रकाराने जिल्ह्यात पुन्हा एकदा राडा संस्कृती जिवंत झाली..

⚡मालवण ता.२९-: मंत्री पद मिळेल, मोदी व शहा यांच्यासमोर मिरवता येईल या हेतूने खास. नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यात येणाऱ्या युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अडविण्याचा नियोजित कट केला. मात्र, हा प्रयत्न शिवसैनिकांनी मोठ्या ताकदीने हाणून पाडला. शिवसैनिक काय असतो हे राणेनी पाहिले. राजकोट येथे झालेल्या प्रकाराने जिल्ह्यात पुन्हा एकदा राडा संस्कृती जिवंत झाली आहे. “घरात घुसून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” असे वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांचा खरा चेहरा समोर आल्याने त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांना आता पश्चाताप होत आहे, राणे व त्यांच्या समर्थकांची ही दादागिरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच झाली, अशी टिका ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

मालवण येथील ठाकरे शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, लक्ष्मी पेडणेकर, युवतीसेना जिल्हा अधिकार निनाक्षी शिंदे मेतर महेश जावकर, नरेश हुले, सन्मेश परब जयदेव लोणे, हेमंत मोंडकर, अक्षय भोसले, नरेश हुले, आयवान फर्नाडिस, वैभव खोबरेकर, सिद्धेश जाधव, दादा पाटकर, अक्षय रेवंडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, मालवण मध्ये आम्ही मोर्चा काढणार असे आधीच जाहीर केले होते. तसेच मोर्चा आणि नेत्यांची राजकोट शिवपुतळा भेट यासंदर्भातही पोलीसांना माहिती दिली होती. असे असताना आमच्या वेळेलाच भाजपा खासदार नारायण राणे यांनाही राजकोट येथे पुतळा पाहणीसाठी वेळ देण्यात आल्याने वाद निर्माण झाला. आम्ही संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करत होतो, तरीही भाजपा कार्यकर्ते आमच्या नेत्यांना शिवीगाळ करत होते, आम्ही संयम बाळगण्याचा प्रयत्न केला, आमच्या नेत्यांच्या आदेशाची आम्ही वाट बघत होतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात कोणताही गोंधळ नको, असे आदेश आम्हाला असल्याने आम्ही शांत राहिलो. भाजप राणे समर्थकांना किल्ल्यातून बाहेर काढण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरली होती, राणे काय करतील ते करू द्यावे असे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले असावेत, त्यामुळे तशीच परिस्थिती दिसून येत होती. राणे समर्थकांची दादागिरी ही पोलीसांच्या आशिर्वादातूनच झाली आहे, असाही आरोप श्री. खोबरेकर यांनी केला.

राजकोट किल्ल्यातील सर्व घटना अख्या जगाने पाहिली आहे. जिल्ह्यात गेले दहा वर्षे बंद असलेली राडा संस्कृती पुन्हा जिवंत झाली आहे. राजकारणातून पैसा आणि पैशांतून जनतेला त्रास देणारी राडा संस्कृती हीच राणेंची राजकारणाची पद्धत आहे. त्यांनी आजपर्यंत कुंकू पुसण्याचेच काम केले आहे, यामुळे त्यांना त्या कुटुंबियांच्या वेदना काय समजणार? त्यांनी आपल्या तोंडातूनच आपली संस्कृती सांगितली असल्याने आगामी निवडणुकीत त्यांना ठाकरे शिवसेनेकडून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येणार आहे. भाजपाची झुंडशाही आम्ही खपवून घेणार नाही. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंनी आपली शेवटची निवडणूक आहे, असे सांगत मतदारांना भावनीक साद घातल्याने मतदारांनी त्यांना मतदान केले, मात्र आता त्याच मतदारांना आता पश्चाताप होत आहे. भाजपामध्ये असलेली मंडळी महाराजांच्या पुतळ्यामध्येही फायदा शोधत आहे, हेही यातून स्पष्ट होत आहे. यामुळे ठाकरे शिवसेनेकडून आता पुन्हा एकदा मतदारांना मिळणाऱ्या संधीतून योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या मालवण बंद आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यापारी आणि शिवप्रेमींचे आम्ही आभार मानतो. मालवणकर जनतेने स्वतःहून बंदमध्ये सहभाग घेतल्याने बंद यशस्वी झाला आहे, त्यासाठी आम्ही जनतेचे आभारी आहोत, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

You cannot copy content of this page