राजकोट येथे शिवरायांचा १०० फुटी भव्य पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार…

ना. दीपक केसरकर:छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेची मंत्री केसरकरांकडून पाहणी..

⚡मालवण ता.२७-: राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याने मनामध्ये खूप दुःख आहे. हि एक दुर्घटना असली तरी वाईटातून काहीतरी चांगले घडावे म्हणून हे घडले असावे. मुंबई येथे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे काम थांबलेले आहे. त्यामुळे राजकोट येथेच महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारून स्मारक बनावे, अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या पुतळ्याच्या धर्तीवर राजकोट येथे १०० फुट उंचीचा महाराजांचा पुतळा उभारला जावा, ही शिवप्रेमींची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत. जेणेकरून महाराजांचे भव्य स्मारक होऊन नौदलाचाही सन्मान होईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकोट येथे बोलताना केले.

मालवण मधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेची आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झाल्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील यांच्यासह शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावकर, बबन शिंदे, किसन मांजरेकर, सोनाली पाटकर, ऋत्विक सामंत, हर्षद पारकर आदी व इतर उपास्थित होते.

यावेळी ना. केसरकर म्हणाले, भारतीय आरमार निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजच होते. म्हणूनच राजकोट याठिकाणी महाराजांचे भव्य असे स्मारक उभारले गेल्यास ते संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण स्थळ असेल आणि खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन याचा आराखडा तयार करून नौदलाशी चर्चा करून नौदलाने व शासनाने हा पुतळा उभारावा, हा पुतळा भव्य असावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत. या पुतळ्याचे उदघाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदीच करतील, असा दावा देखील ना. केसरकर यांनी केला. तसेच राजकोटच्या परिसरात एक जेटी निर्माण झाल्यास जेटीवरून बोट प्रवासाने देखील पर्यटक याठिकाणी येऊ शकतील, असेही केसरकर म्हणाले.

ना. केसरकर म्हणाले, शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी नौदलला कोणीच बदनाम केलेले नाही. मी तर नौदलाचा सन्मानच केला आहे. त्यामुळे यातून राजकारण करण्यात काही अर्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा संपूर्ण राज्याचा आणि देशाचा सन्मान आहे. या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा उभारणे आवश्यक आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी च्या धर्तीवर हा पुतळा महाराष्ट्र शासन उभा करू शकते शिवप्रेमींची ही जी इच्छा आहे, ती एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून राज्य शासनाकडे पोहोचवेन. त्याचबरोबर राजकोट किल्ल्या परिसराचा संपूर्ण पणे विकास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक बनेल, असेही केसरकर म्हणाले.

You cannot copy content of this page