अण्णा केसरकर:भाजपच्या नेत्यांनी आणि प्रशासनाने झालेल्या प्रकाराची माफी मागण्याची गरज..
⚡सावंतवाडी ता.२७-: स्वतःची राजकीय पोळी भाजून खुर्ची वाचविण्यासाठी राजकारणी लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करत असल्याची टीका ज्येष्ठ नेते अण्णा केसरकर यांनी केली असून, भाजपच्या नेत्यांनी आणि प्रशासनाने झालेल्या प्रकाराची माफी मागण्याची गरज होती, परंतु, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नेते राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणी भगवा ध्वज उभारला होता, तो ध्वज स्तंभ अजून हि तसाच आहे परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करून काही महिन्यांपूर्वी उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडलाच कसा यांची चौकशी होणे गरजेची आहे. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली होती. त्याचाच बदला ही गुजराती व्यापारी वृत्तीची माणस घेत असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करत आहे. आपण मराठी माणस हा अपमान सहन करणार आहोत का? असा प्रश्न उपस्थित करत, जरी आपण वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी आज गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन याबाबत आवाज उठविण्याची सरकारला प्रश्न विचारण्याची असे आवाहन केले आहे.
