निलेश राणे:लवकरच महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल..
⚡मालवण ता.२७-:
राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना आहे. महाराज आम्हा सर्वांचे दैवत आहेत. यातील जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. मात्र किल्ले राजकोट येथे लवकरच महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल, असे भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी किल्ले राजकोट येथे बोलताना सांगितले.
मालवण मधील राजकोट किल्ल्यातील नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काल दुपारी कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजप नेते निलेश राणे यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, पंकज सादये, राकेश सावंत, ललित चव्हाण, आशिष हडकर, निषय पालेकर, अखिलेश शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.
पाहणी नंतर पत्रकारांशी बोलताना निलेश राणे म्हणाले, शिवपुतळा कोसळण्याची घटना घडायला नको होती. जे घडले ते राग येण्या सारखेच आहे. जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यातून जे काही घडले असले ती रागातून आलेली प्रतिक्रिया होती, त्यात काही गैर नाही. शिवप्रेमींच्या भावना मी समजू शकतो. संयम दाखविण्यासारखी ही घटना नाही. मात्र, तरीही शिवप्रेमी जनतेने जो संयम दाखवला, त्यासाठी त्यांचे आभारी आहोत. दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आमचाही पाठपुरावा सुरूच राहील, असेही निलेश राणे म्हणाले.
