पोलीस पाटील नियुक्तीपत्रे मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे…

सिंधुदुर्गनगरी ता २०
पोलीस पाटील भरती २०२३ मधील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळावीत, यासाठी आज मंगळवारी या सर्व उमेदवारांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेतली.आणि आपली निवड होऊनही अद्याप नियुक्ती पत्र मिळाली नाहीत याकडे लक्ष वेधले.

या सर्व उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले यात त्यांनी असे नमूद केले आहे की,मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरती २०२३ हा कार्यक्रम शासनाने निश्चित केलेल्या तारखांप्रमाणे योग्य प्रकारे पार पडला आहे. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील अंतिम निवड झालेल्या उमेदवारांसह प्रतिक्षा यादी दिनांक १५ मार्च२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर दिनांक ०८ जुलै २०२४ ते १८ जुलै २०२४ या कालावधीत अंतिम कागदपत्र पडताळणी देखील पार पडली आहे.

या भरती प्रक्रियेतील आम्ही सर्व उमेदवार सदरची निवड यादी प्रसिद्ध झाल्यापासून नियुक्ती पत्रांच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु, गेल्या तीन महिन्यापासून अ‌द्याप पर्यत आम्हाला नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही .आम्ही आमच्या हातातील असलेला कामधंदा सोडून भरती प्रक्रियेच्या आशेवर आहोत. गेल्या तीन महिन्यापूर्वी नियुक्ती पत्र देणे शक्य असताना तसे न केल्याने आमचे आर्थिक नुकसान झाले आहे.
उपविभागीय अधिकारी कुडाळ यांचे कार्यकक्षेतील भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झाले असल्याने अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र देण्याबाबत संबंधित यंत्रणेस आदेशित करण्यात यावे. अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी रवींद्र कदम, समीर तोरस्कर, ज्ञानेश्वर तांडेल, वैभव ढवळे, तुषार जाधव, हर्षिता ठाकूर, शितल झोरे, छाया कोकरे, श्वेता मेस्त्री, समीर वालावलकर, प्रकाश डोईफोडे, स्वप्निल परब यासह निवड झालेले सर्व उमेदवार उपस्थित होते.

You cannot copy content of this page