Headlines

बहिणींनी भावाकडून अंमली पदार्थांचे व्यसन न करण्याचे वचन घ्यावे-:प्रवीण कोल्हे…

मालवण दि प्रतिनिधी
रक्षाबंधनावेळी भावाने बहिणीला आणि बहिणीने भावाला कुठच्याही प्रकारच्या वस्तू, पैसे स्वरूपात ओवाळणी न मागता बहिणीने भावाकडून तो कोणत्याही अंमली पदार्थाच्या आहारी जाणार नाही किंवा व्यसन करणार नाही असे वचन घ्यावे तसेच भावाने सुद्धा बहिणीला मी कधीही यापुढे आयुष्यात अंमली पदार्थांचे व्यसन करणार नाही असा शब्द द्यावा व येणारा रक्षाबंधन हा अनोख्या पद्धतीने साजरा करावा असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आज येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून जानेवारी २०२४ मध्ये ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्याचाच पुढील भाग म्हणून ११ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी पंधरवडा सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच सर्व शासकीय संस्थांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे तसेच अंमली पदार्थ विरोधी पदार्थांवर तसेच त्यांची खरेदी व विक्री यासंबंधी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

अंमली पदार्थ विरोधी पंधरवडाचे औचित्य साधून येथील भंडारी हायस्कूल येथे आज अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन तसेच पथनाट्याचे आयोजन मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी युवक वर्गाला आणि विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि त्यांच्या व्यसनाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी भंडारी हायस्कूलचे प्राचार्य श्री. तिवले तसेच प्रा. पवन बांदेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. यशवंते, पोलिस हवालदार सुशांत पवार तसेच विद्यार्थी, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

या पंधरवड्याचे औचित्य साधून मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध प्रकारचे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम सुरू झाले आहेत. यामध्ये पथनाट्य, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा यांचे विविध शाळा आणि कॉलेजमध्ये आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पथनाट्याच्या माध्यमातून सुद्धा शाळा, कॉलेज तसेच आठवडा बाजार यामध्ये प्रबोधनाचे काम पोलिस ठाण्याच्या वतीने सुरू आहे अशी माहिती देण्यात आली.

आजच्या युवक वर्गाचा सोशल मीडिया वरील वाढता सहभाग तसेच कल पाहता जानेवारी २०२४ मध्ये ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग या संकल्पनेवर मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धा घेण्यात आली होती. त्याला संपूर्ण जिल्हाभरातून युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यावेळी सुध्दा युवा वर्गाची आवड लक्षात घेऊन इंस्टाग्राम, फेसबुकवर ११ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२४ या पंधरावड्याच्या निमित्ताने शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व अंमली पदार्थाचे दुष्परिणाम व त्या दृष्टीने होणारे सामाजिक नुकसान याबद्दल जनजागृती करण्याचे काम मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page