मळगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेती तज्ञ व कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर प्रतिपादन
*⚡सावंतवाडी ता.०३-:* मागील दोन वर्षात कोविड-१९ या रोगामुळे लागलेल्या लाॅकडाऊनच्या काळात देशातील सर्व उद्योग -व्यवसाय बंद पडले होते. केवळ शेती हा उद्योग देशात सुरु होता. त्यामुळे शेती हाच उद्योग व या उद्योगाशी निगडीत व्यवसाय यांना कोकणातील तरुणांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आज मळगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेती तज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी केले.
मळगाव-आजगावकर येथील सुधाकर भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्त मंदिर येथे आज महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, कृषी अधिकारी विजय वाघमारे, शेती तज्ञ चेतन प्रभू, मळगाव कृषी सहाय्यक छाया मेस्त्री, कुडाळचे कृषी सहाय्यक सचिन चोरगे, तळवडे कृषी अधिकारी यशवंत गवाणे, पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी रसायन शास्त्र विषयाचे प्रमुख प्राध्यापक गणपत शिरोडकर, मळगांव ग्रामपंचायत सदस्या निकिता बागडे, सदस्य आनंद देवळी यांच्यासहित मळगांव मधील शेतकरीबंधू उपस्थित होते. या मेळाव्यात उपस्थित कृषी अधिकारी व तज्ञांनी आंबा व काजू मोहर संरक्षण मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण या विषयासहित माती परीक्षण व शेती व्यवस्थापन या विषयांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. या मेळाव्यात उपस्थित शेतकरी बांधवांनी आपले शेती विषयक प्रश्न मांडून कृषी अधिकारी व तज्ञांकडून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. यावेळी चेतन प्रभू यांनी ज्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात माती परीक्षण व शेती व्यवस्थापन केले जाते तसे व्यवस्थापन येथील शेतकरी बांधवांनी कसे करावे, शेती मालाची विक्री कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. सचिन चोरगे यांनी आपले मत मांडताना येणारा काळ हा शेतकरी बांधवांचा असेल असा विश्वास व्यक्त करुन याबाबत शासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. विजय वाघमारे यांनी शेती व फळझाडे यांना किड व रोग लागू नयेत यासाठी साफसफाई व फवारणी आवश्यक असल्याचे सांगितले. यशवंत गवाणे यांनी शेतकऱ्यांनी स्मार्ट फोनचा वापर करुन शेती विषयक आधुनिक ज्ञान प्राप्त करावे, जमिनीचे आरोग्य जपावे, जेसीबी चा वापर टाळावा, तरुणांनी नोकरीच्या शोधात शहरात न पळता शेतीकडे वळावे असे सांगितले. या मेळाव्याचे प्रास्ताविक गणपत शिरोडकर, सूत्रसंचालन उदय पाटील तर आभारप्रदर्शन आनंद देवळी यांनी केले.