तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित नाही…

मिलिंद सावंत:लवकरात लवकर बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करा;अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदोलन..

⚡बांदा ता.२९-: महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अ‌द्याप पर्यंत सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित झालेली आढळून येत नाही. अशा परिस्थितीत सध्या प्रशासनाच्या विविध योजनांसाठी सामान्य नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत लागणारे दाखले मिळवताना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात वेळेत न येणे तसेच वेळेपूर्वी कार्यालयात उपस्थित नसणे अशामुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेताना दाखले मिळण्यास उशीर झाल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे लाभार्थी शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतो. यासाठी लवकरात लवकर बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करावी अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वस्तीसाठी राहणे बंधनकारक आहे व यासाठी त्यांना शासनामार्फत निवास भत्ता सुद्धा दिला जातो. तरीही काही अधिकारी सोडले तर बरेचसे अधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रात बाहेर आपल्या मूळ गावी अथवा शहराच्या ठिकाणी राहतात व शासकीय भत्त्याचा लाभ घेतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत आम्ही आपणाकडे आग्रही मागणी करत आहोत की आपण शासन निर्णयानुसार सावंतवाडी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली पद्धतीच्या निर्णयाची लवकरात लवकर कडक अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे तिला जाणारा निवासी भत्ता बाबत योग्य ती शहानिशा करूनच देण्यात यावा अन्यथा येत्या १५ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गटविकास अधिकारी कार्यालयावर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
You cannot copy content of this page