ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांचा इशारा..
⚡दोडामार्ग ता.२७-: रेशनकार्ड धारकांना सोमवार (ता. २९) पर्यंत धान्य वितरण झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने गोडावून फोडून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण केले जाईल असा इशारा
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिला आहे.
शासनाने रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण करण्यासाठी धान्य दुकानदारांकडे दिलेल्या ई पॉस मशीनला सर्व्हर डाउन असल्याने एरर येत आहे.त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील धान्य वितरण प्रणाली ठप्प झाली आहे. यामुळे रेशनकार्ड धारक तसेच दुकान धारक दरम्यान वाद होत आहेत. लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. असे असताना शासन स्तरावरून ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरण देखील केले जात नाही.सर्वासामान्य लोकांचे हाल होत असल्याने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी सर्व्हर चालत नाही तर गोडावूनमध्ये धान्य वितरण का केले. असा सवाल करुन सोमवार (ता. २९) पर्यंत धान्य वितरण झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने गोडावून फोडून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरण केले जाईल असा इशारा दिला. तसेच होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असेही म्हटले आहे.
ऑफलाईन धान्य वाटप करण्यास केंद्र सरकारची परवानगी नाही. ऑफलाईन धान्य वाटप केल्यास केंद्र शासनाकडून मार्जिनच्या रकमेची व इतर खर्चांची प्रतिपूर्ती मिळत नाही.त्यामुळे धान्य वाटपाच्या मुदतवाढीसाठी केंद्र शासनास पत्र पाठविण्यात आले आहे.
संतोष मोरे, नायब तहसीलदार
धान्य वाटपाला या महिन्यात मुदतवाढ मिळणार आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोकांची धान्य न मिळाल्याने होणारी फरफट थांबावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
गणेशप्रसाद गवस, तालुकाप्रमुख, शिवसेना ( शिंदे गट )
तहसीलदारांची भूमिका अयोग्य
लोकांच्या भुकेचा प्रश्न असल्याने मी चर्चा करण्यासाठी तहसीलदारांना फोन लावत होतो. पण ते फोन उचलत नव्हते. आपत्कालिन काळात त्यांची ही कृती गंभीर असून मी त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार करणार आहे, असेही श्री धुरी यांनी सांगितले.
