गणेश पाडगावकर: मालवण नगरपालिकेकडे केली मागणी..
⚡मालवण ता २४-: मालवण शहरातील भरड एसटी स्टॅन्ड ते रेडकर हॉस्पिटल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने या भागातील गटार व मोऱ्या यांची दुरुस्ती करून या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व एसटी स्टॅन्ड परिसरातील रहिवासी गणेश पाडगावकर यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे.
मालवण नगरपालिकेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेऊन गणेश पाडगावकर यांनी निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, सदस्य जेम्स फर्नांडिस, युवक काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, बाबा मेंडिस, योगेश्वर कुर्ले, श्रेयस माणगांवकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
भरड मालवण बस स्टॅण्ड ते रेडकर हॉस्पिटल येथे साचणारे पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. या भागात असणाऱ्या मोऱ्या बुजल्या असून त्या परत खोदून पाण्याचा मार्ग व आर. सी. सी. बांधकाम करुन देऊळवाडा पुलापर्यंत पाणी सोडण्यात यावे. तसेच टुरिस्ट लॉज हॉटेल समोर पाणी निचरा होण्यासाठी असलेला तात्पुरत्या स्वरूपातील पाईप बंद असल्यामुळे पाणी वाहत नाही. त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांमुळे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. तरी गणेश चतुर्थी सणापर्यंत लवकरात लवकर याठिकाणी रोड क्रॉसिंग आर. सी. सी. मोरीचे काम करुन साचणारे पाणी मार्गस्थ करावे, तसेच तेथील गटारांची आणखी खोदाई करावी, अशी मागणी गणेश पाडगावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी ही समस्या समजावून घेत याबाबत उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन दिले तसेच मोऱ्या व गटारे यामध्ये कचरा टाकू नये किंवा कचऱ्यामुळे पाणी वाहण्यास अडथळा होणार नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे जिरगे यांनी सांगितले
