मालवणात हत्तीरोग रुग्ण सापडण्यास नगरपालिका प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार…

महेश कांदळगावकर:नगरपालिकेच्या प्रशासकांची स्वच्छतेची मोहीम फक्त फोटो आणि ईव्हेंट पुरती मर्यादित..

⚡मालवण ता.२३-:
गेल्या अडीज वर्षात मालवण शहरात डास प्रतिबंधक फवारणी, स्वच्छता व इतर उपाययोजनांकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने त्याचा परिणाम म्हणून हत्तीरोग निर्मूलन झालेल्या मालवण शहरांत अनेक वर्षांनी पुन्हा हत्तीरोगाचे रुग्ण सापडले आहेत. याला पूर्णपणे मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार असून मालवणात नगरपालिकेने राबविलेले स्वच्छता मोहिमेचे कार्यक्रम हे फक्त इव्हेन्ट पुरतेच होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी जोरदार टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

सन २००५ च्या दरम्यान मालवण शहरात जवळपास हत्तीरोगाचे ९० रुग्ण सापडून आले होते. त्यावेळी मालवण नगरपरिषद, आरोग्य विभाग यांनी दिवस रात्र मेहनत करून जवळपास एका वर्षाच्या कालावधीमध्ये ही रुग्ण संख्या आटोक्यात आणली होती. मालवण नगरपरिषद सातत्याने डास फवारणी करणे, धूर फवारणी, सेफ्टिक टाक्यांच्या व्हेंट पाईप्सना जाळ्या बसविणे, सार्वजनिक सेप्टिक टॅंकच्या टाक्या सक्शन गाड्या लावून उपसून घेणे इत्यादी उपाय योजना करत असल्याने २०१४ पर्यंत रुग्ण संख्या शून्य पर्यंत आणण्यात यशस्वी झाली. त्यानंतर २०२१ पर्यंत या डास प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात होत्या. पण आमचा लोकप्रतिनिधीचा कालावधी २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालखंडात या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. आणि त्याचा परिणाम म्हणून २०१४ पासून आटोक्यात आणलेल्या हत्ती रोगाचा फैलाव गेल्या अडीच वर्षाच्या प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा रुग्ण सापडल्याने फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील दोन वर्ष सातत्याने डास फवारणी, स्वच्छता करणे बाबत सूचना करूनही ही बाब गांभीर्याने न घेतल्याने ही परिस्तिथी निर्माण झाली आहे, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

आमच्या कालावधीत पूर्णतः साफ केलेल्या मालवणच्या डपिंग ग्राउंडवर आज पुन्हा कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. फोवकांडा पिंपळ येथील कारंजा दीड वर्ष बंद आहे आणि त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासाच्या अळ्या पडल्या आहेत याचे फोटो प्रसिद्ध करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. स्वच्छता करा, फवारणी करा याबाबत लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे पदाधिकारी यांना निवेदने द्यावी लागतात ही शोकांतिका आहे. ही सगळी कामे करण्यासाठीच शासनाने पगारी कर्मचारी नियुक्त केले आहेत, मात्र कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे त्याचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतात. वास्तविक पाहता नगरपालिका निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय कारभार हा प्रांत दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला जायचा, त्यामुळे नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कामावर त्यांचा वचक असायचा. परंतु मालवण नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांकडेच प्रशासकाचा कार्यभार दिल्याने एकाच व्यक्तीकडे दोन्ही पदे असल्याने बिना अंकुश काम सुरू आहे, अशी टीका महेश कांदळगावकर यांनी केली आहे. तसेच मालवण नगरपालिकेच्या प्रशासकांची स्वच्छतेची मोहीम फक्त फोटो आणि ईव्हेंट पुरती मर्यादित आहे, हत्ती रोगाचा रुग्ण सापडल्याने त्यावर शिक्का मोर्तब झाले आहे, अशी टिकाही कांदळगावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page