⚡कुडाळ ता.२२-: समाजात अशी अनेक माणसे आहेत जी नेहमीच आपल्या कार्याने समाजाला मार्गदर्शन करत असतात. अशा निवडक व्यक्तींचा आणि संस्थांचा ब्राह्मण सभा कुडाळ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. औचित्य होते गुरु पौर्णिमा उत्सवाचे. रविवारी सायंकाळी कुडाळच्या कुडाळेश्वर मंदिरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
गुरु पौर्णिमेच औचित्य साधून ब्राह्मण सभा कुडाळ यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती जीवन आनंद संस्थेचे संदीप परब, मिशन आधार संस्थेचे सम्राट कुडतरकर, वेदमूर्ती सचिन भाटवडेकर, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देसाई, ब्राह्मण सभेचे कुडाळ तालुका अध्यक्ष अमेय आठल्ये, माजी अध्यक्ष प्रकाश कुंटे, उषा आठल्ये उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलन करून आणि श्री परशुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
गुरु हा केवळ एक शब्द नसून जीवनाचं सार समजवण्याची आणि घडविण्याची ताकद असलेली व्यक्ती म्हणजे गुरु. एक वेगळा दृष्ठीकोन देऊन नवी दिशा दाखवणारी व्यक्तिमत्व हि गुरुसमानच असतात. अशा व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला. जीवन आनंद संस्थेचे संदीप परब यांचा पीडित,दुर्बल यांच्यासाठी असलेल्या कार्यासाठी उषा आठल्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर कोरोना काळापासून समाजातल्या पीडितांसाठी आधारवड ठरलेल्या आधार मिशनचे सम्राट कुडतरकर यांच्या सत्कार प्रकाश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आला. नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मिलिंद देसाई यांचा सत्कार प्रकाश कुंटे यांनी केला तर वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांनी उषा आठल्ये यांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा असं या सत्काराच स्वरूप होत. ब्राह्मण सभेचे प्रकाश कुंटे यांनी नुकतीच वयाची ७६ वर्ष पूर्ण करून ७७ व्य वर्षात पदार्पण केलं त्याबद्दल त्यांना देखील सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर देताना ब्राह्मण सभेचे आभार मानले.
या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा कुडाळचे अध्यक्ष अमेय आठल्ये, माजी अध्यक्ष प्रकाश कुंटे, सचिव दीपाली मणेरीकर, नीलाक्षी कशाळीकर, अमेय कशाळीकर, शशांक जडये, राजू जांभेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांचं गुरुपरंपरेवर आधारित प्रवचन झालं. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केलं. या कार्यक्रमाला कुडाळमधील रसिक उपस्थित होते.
