“त्या” विक्षिप्त व्यक्तीवर कडक कारवाई करा…

शिरोडा नाक्यावरील नागरिकांची मागणी:तर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय; पोलीस निरीक्षक,अमोल चव्हाण..

⚡सावंतवाडी ता.२२-: शिरोडा नाका येथील नागरिकांनी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेत त्या विक्षिप्त व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, माड कापून लोकांच्या जीवितास हानी पोहोचेल असे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. ‌

हा इसम गेली कित्येक वर्षे अशा प्रकारचे कृत्य वारंवार करीत आलेला आहे. यासंबंधित प्रकाराची आपल्या धर्तीवर सखोल चौकशी करावी. या व्यक्तीकडून आमच्यासह अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आजची घटना बघता संबंधिताची मानसिक स्थिती खालावली असल्याचेच जाणवत आहे. त्यामु‌ळे अशा प्रकारचे कृत्य पुन्हा घडू शकते. या प्रकाराचा विचार करता संबंधितावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा भविष्यात लोकांचे हकनाक जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या विनंतीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा असं निवेदन शिरोडा नाका येथील नागरिकांनी पोलिस निरीक्षकांकडे दिलं.

यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, संबंधित व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतले आहे. लोकांच्या जीवीतास धोका, इलेक्ट्रीसीटी अॅक्ट व नगरपरिषदेची परवानगी न घेता वृक्ष तोड आदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगरपरिषद व महावितरणच्या अधिकाऱ्यांचा जबाब देखील यात घेतला जाणार आहे‌. संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षकांनी दिली. याप्रसंगी आबा सावंत, संजय वरेरकर, क्लेटस फर्नांडिस, अनिल सावंत, सुशील चौगुले, मंजुनाथ देसकर, रोहन नरसुले, संदीप नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page