⚡मालवण ता.२०-: गेल्या काही दिवसापासून शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न आहेत. या प्रश्र्नांची सोडवणूक व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने गेल्या काही महिन्यात चार ते पाच वेळा निवेदने देऊन चर्चा केली. तसेच 9 जुलै 2024 रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन छेडले व अधिकारी यांच्या भेटी घेवून लक्ष वेधले होते. परंतू सातत्याने पाठपुरावा करूनही प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने सोमवार 22 जुलै 2024 पासून सकाळी ११ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकात प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष पाताडे यांनी शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लगेच कार्यमुक्त करण्यात यावे व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबून संबंधित बदलीधारक शिक्षकांना सदरच्या रिक्त जागा दाखविण्यात याव्यात, समांतर आरक्षणातील समुपदेशन झालेल्या शिक्षकांना तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत, पवित्र प्रणालीने भरती करण्यात येत असलेल्या नवनियुक्त शिक्षक पद भरती बाबतचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्यात यावे, नवनियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी तातडीने मिळणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी, २००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डीसीपीएस रक्कम व सहाव्या वेतन आयोगाचे एक ते पाच हप्ते त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा करणेबाबत निमशिक्षकांची (वस्तीशाळा) नियुक्ती शासन निर्णयांच्या दिनांकापासून करण्यात यावी व फरक मिळणे बाबत, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षकांचे प्रमोशन बाबत, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इंधन व भाजीपाला अनुदान व धान्यदी माल वेळेत मिळण्या बाबत, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी बाबत, 2006 ते 5 सप्टेंबर 2018 पूर्वीच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वेतन वाढ निश्चिती प्रस्तावा बाबत, माध्यमिक कडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या व तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना स्थायी आदेश मिळण्याबाबत, सन 2019 मधील मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक मिळणेबाबत, 2005 पूर्वीच्या शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्या बाबत, महाराष्ट्र दर्शन व प्रवास भत्ते बिले मिळणेबाबत,चार टक्के सादील अनुदान मिळणे बाबत, जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी क्रीडा स्पर्धा व विद्यार्थी उपक्रमाबाबत व शिक्षकांना पूर्ण वेळ मुलांना शिकविण्यास देणेबाबत, प्रभारी केंद्रप्रमुख नेमणुकीबाबत, प्रलंबित गणित विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना तात्काळ नियुक्ती देण्याबाबत, निवड श्रेणी प्रस्तावा बाबत, नवनियुक्त शिक्षकांचे सेवासातत्य प्रस्ताव तात्काळ मागविण्याबाबत, शनिवारच्या शाळेच्या वेळेबाबत फेरविचार करण्याबाबत अशा २० प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाची नोटीस प्रशासनाला देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.
