आमदार नितेश राणे:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली पत्राद्वारे विनंती..
⚡देवगड ता.२०-: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून या योजनेत देशातील एकूण १३९ धार्मिक स्थळांचा समावेश असून यामध्ये महाराष्ट्रातील ६६ तील धार्मिक स्थळांच्या समावेश आहे मात्र एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थक्षेत्र आहे.या योजनेत कुणकेश्वर धार्मिक स्थळाचा समावेश होणे अपेक्षित होते.मात्र या स्थळाचा समावेश नसल्याने कुणकेश्वर वासियांमधून नाराजीचे सूर दिसत होते. आमदार नितेश राणे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देताच आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कुणकेश्वर देवस्थानच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेत समाविष्ट करण्याबाबत विनंती केली आहे .
या पत्रात नमूद केले आहे की,
राज्यातील अनेक देवस्थाने तसेच तीर्थक्षेत्र यांचा मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेत समावेश आहे.त्यामुळे त्याचा लाखो भाविकांना प्रतिवर्षी होत असतो. परंतु कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राचीन जगप्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानचा सदर योजनेत समावेश नसल्याने अनेक भाविकांना भक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. तरी कुणकेश्वर देवस्थानच्या मुख्यमंत्री तिर्थयात्रा दर्शन योजनेत समावेश केल्यास अनेक चाकरमान्यांना प्रतिवर्षी दर्शनासाठी जाणे सोयीचे होईल. अशी विनंती आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
