‘मिशन स्थिरता’ अंतर्गत केली अन्नधान्याची मदत
⚡कुडाळ ता.१८-: अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या ओरोस-ख्रिश्चनवाडीतील नागरिकांना मिशन आधारने मदतीचा हात दिला. त्या पूरग्रस्त कुटुंबियांना ‘मिशन स्थिरता’ अंतर्गत अन्नधान्य आणि इतर मदत करण्यात आली.
7 जुलै रोजी पडलेल्या पावसाने कुडाळ तालुक्यात लोकांचे फार मोठे नुकसान झाले. मुंबई गोवा महामार्ग तब्बल 14 तास बंद होता. पावशी, हुमरमळा, वेतळबाबर्डे,ओरोस येथे लोकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते.
त्याच दिवशी ओरोस जिजामाता चौक आणि ख्रिश्चनवाडी मध्ये पावसाचे पाणी घुसले. काही जणांची घरे कोसळली. निवारा हरपला. धान्य भिजले, वाहून गेले, काय खायचे कसे जगायचे हा प्रश्न निर्माण झाला.
या लोकांसाठी अनेक मदतीचे हात आता पुढे येत आहेत. नेहमीच समाजासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या मिशन आधार या संस्थेच्या वतीने सुद्धा ख्रिश्चनवाडीतील या नुकसानग्रस्त लोकांना मदत देण्यात आली. अन्नधान्य आणि इतर स्वरूपात ही मदत त्या नुकसानग्रस्त कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. या कामी मदत करणारे वैभव घाग, सागर तुळसकर, वामन सावंत, सचिन भोने, साईप्रसाद दळवी यांचे मिशन आधार यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. मिशन स्थिरता या टॅग खाली राबविण्यात आलेल्या मदत अभियानाने त्या पुरग्रस्तांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रु तरळले. देव बरा करो तुमच्या सगळ्यांचा असा आशीर्वाद त्या कुटुंबीयांनी मिशन आधारच्या कार्यकर्त्यांना दिला.
