कोणतेही राजकीय आरोप प्रत्यारोप सभेत न होता मात्र प्रशासनावर सर्वपक्षीय बरसले..
⚡ओरोस ता.१६-: खा नारायण राणे, आ नितेश राणे यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी पार पडलेली जिल्हा नियोजन सभा शांततेत पार पडली. कोणतेही राजकीय आरोप प्रत्यारोप न झालेल्या या सभेत प्रशासनावर मात्र सर्वपक्षीय बरसले. जिल्हा परिषद, बांधकाम, शिक्षण, एस टी, ग्रामसडक योजना, वीज वितरण हे विभाग सभागृहात टार्गेट ठरले. यावेळी काम चुकार अधिकाऱ्यांवर तसेच कामांचे ठेके घेवून ती विहित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
तब्बल सहा महिन्यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाच्या नवीन सभागृहात संपन्न झाली. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, आ निरंजन डावखरे, आ वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले आदी अधिकारी तसेच स्वीकृत सदस्य संदेश सावंत, हेमंत कुडाळकर, अबिद नाईक, प्रफुल्ल सुद्रिक, सावळाराम अणावकर, दिलीप गिरप, महेश सारंग, अशोक सावंत, सुधीर नकाशे, अशोक दळवी, सचिन वालावलकर, राजेंद्र निंबाळकर यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त खासदार नारायण राणे, आ निरंजन डावखरे यांचा अभिनंदन ठराव मांडण्यात आला. तसेच शहीद जवान, मृत झालेल्या प्रतिष्ठित व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
