ओंकार नाडकर्णी:हायवेच काम सुरु असताना एकदाही प्रतिक्रिया न देणाऱ्यांना आता ग्रामस्थांचा पुळका का आला..?
बांदा/प्रतिनिधी
सटमटवाडी येथील सेवा रस्त्याच्या मुळ आराखड्यात कोणी बदल केला हे बांदा शहरातील जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हायवेचे काम सुरु असून देखील भाजपाचे बांदा शहर अध्यक्ष यांनी एकदाही प्रतिक्रिया न देता त्यांना आताच सटमटवाडी ग्रामस्थांचा पुळका का आला? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे ओंकार नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रक दिले आहे. आराखड्यात कोणताही बदल न करता मुळ आराखड्याप्रमाणेच बोगद्याचे व सेवा रस्त्याचे काम झाले पाहिजे यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. यासाठी प्रसंगी आम्ही देखील सटमटवाडी ग्रामस्थ्यांसोबत रस्त्यावर उतरू असा इशारा देखील नाडकर्णी यांनी दिला आहे.
काल भाजपचे शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी सटमटवाडी बोगद्याच्या कामासंदर्भात बांदा शहर भाजप ही स्थानिकासोबतच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्याला आज नाडकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले. मुळ आराखड्यात बदल करणारे हे भाजप शहर अध्यक्ष यांच्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे प्रेम व्यक्त करून सटमटवाडीवासियांच्या भावनांशी खेळ करू नये. विशेष सभेत ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली आहे. पूर्ण महामार्गचे काम हे मुळ आराखड्यानुसारच व्हावे अशी आमची मागणी असल्याचे श्री नाडकर्णी यांनी सांगितले.
