पळून जाण्यामागे पालकमंत्री सामंत यांचा हात;भाजपच्या तोरसकर यांचा गंभीर आरोप
मालवण-:मत्स्य विभागाने काल आचरा येथील समुद्रात एलईडी लाईट व जनरेटर असलेली रत्नागिरी येथील नौका पकडल्यावर आज दुसऱ्या दिवशी ही नौका पळून गेली. ही नौका रत्नागिरी मधील असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांच्या आशीर्वादानेच या नौकेने पलायन केले असल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते रविकिरण तोरसकर यांनी केला असून याबाबत दि. ५ एप्रिल रोजी भाजपातर्फे मत्स्य अधिकारी, तहसीलदार व पोलिसांना जाब विचारला जाणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या मत्स्य अधिकाऱ्यांनी शीतल या गस्ती नौकेद्वारे आचरा समुद्रात एलईडी लाईट, जनरेटर आदी बंदी असलेले साहित्य असणारी रत्नागिरी येथील नौका पकडली होती. नौका पकडून मालवण बंदरात आणून अवरुद्ध करून ठेवण्यात आली होती. मात्र आज ही नौका दिसून न आल्याने ती पळून गेल्याचे समोर आले आहे. याबाबत भाजपचे रविकिरण तोरसकर यांनी मत्स्य विभागावर टीका करतानाच पालकमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. पकडलेली नौका रत्नागिरी येथील असल्याने तिला पालकमंत्री उदय सामंत यांचा आशीर्वाद आहे. पालकमंत्र्यांशी साटेलोटे कनेक्शन असल्यामुळेच पकडलेल्याअनधिकृत एल्ईडी नौकेने पलायन केले, असा आरोप तोरसकर यांनी केला आहे. याबाबत भाजपा तर्फे मत्स्य अधिकारी यांना आक्रमक जाब विचारला जाणार आहे. सोमवार दि. ०५ एप्रिल रोजी भाजपा कार्यकर्ते मत्स्य अधिकारी, तहसीलदार कार्यालय तसेच पोलिस कार्यालय यांना जाब विचारणार आहे, असे तोरसकर यांनी म्हटले आहे. भाजपा कायमच अनधिकृत मासेमारीच्या विरोधात आहे. विशेषतः परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर व एलईडी मासेमारी यांच्या अतिक्रमणाबद्दल संवेदनशील आहे. यापुढे पकडुन आणलेली नौका सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपा चौकस रहणार असून अनधिकृत मासेमारी करणाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपचे विशेष पथक मत्स्य विभाग बरोबर कार्यरत राहणार आहे, असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
