अरविंद मोंडकर :जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी..
⚡मालवण ता.११-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसानझाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्ताना येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली व यामुळे घरांमध्ये पाणी जाऊन पडझड झालेली आहे. तसेच शेतीचे देखील नुकसान झाले असुन मुसळधार पावसाने शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत तात्काळ ग्रामीण भागात तलाठी व संबंधित अधिकारी यांना पाठवून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. मालवण, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, देवगड या आठही तालुक्यातील तहसीलदार यांनी केलेल्या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मागवून घ्यावा व येत्या आठ दिवसांत नुकसान ग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, असे अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
