काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याचा वेढा…

शेतीचे मोठे नुकसान:प्रशासनाकडून मदतकार्य सूरू..

⚡मालवण ता.०८-: गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्लीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने सोमवारी पहाटे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. काही घरांना पाण्याने वेढा दिल्याने बागवाडी ग्रामस्थांची तारांबळ उडून शेतकरी व ग्रामस्थांनी आपली गुरे, ट्रॅक्टर, शेती अवजारे व अन्य वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र पुरसदृश्य स्थितीमुळे काळसे धामापूर येथील शेतीचे मोठे नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांची काही गुरे व पॉवर ट्रिलर पुराच्या वेढ्यामध्ये अडकली आहेत.

दरम्यान, तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्यासह प्रशासन यंत्रणेने तातडीने काळसे बागवाडी येथे धाव घेऊन ग्रामस्थांसाठी मदत कार्य सुरु केले असून स्थानिकांशी चर्चा करत त्यांना धोका न पत्करता सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे कर्ली नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने काळसे बाग वाडीत पाणी शिरून पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. यामुळे ग्रामस्थांची झोप उडून त्यांनी आपली गुरे व इतर शेती साहित्य हुबळीचा माळ येथील सातेरी मंदिर येथे सुरक्षित स्थळी हलवली. पुराच्या पाण्यामुळे काळसे धामापूर मधील शेती क्षेत्रात नांगरणीसाठी वापरण्यात शेतकऱ्यांचे अनेक पॉवर टीलर पुराच्या पाण्याखाली अडकल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. तसेच लावणी साठी काढून ठेवलेला तरवा देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी काळसे येथे भेट देउन बागवाडी येथील पुरस्थीतीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी स्थलांतर केल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था नजीकच्या शाळेमध्ये केली असून त्यांच्या जेवण, खाण्याची व्यवस्थाही प्रशासना कडून करण्यात येईल असे सांगितले. पुरस्थिती अधिक गंभीर झाल्यास आवश्यक लाईफ जॅकेट आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्याच्या सूचना यंत्रणेस दिल्या. विहीरींमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे सर्व नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच पुराचा धोका वाढल्यास लगेच स्थलांतर करु, असे ग्रामस्थांनी तहसीलदार यांना सांगितले.

यावेळी मंडळ अधिकारी डी. व्ही शिंग्रे, हेड कॉन्स्टेबल टी. जी. मोरे, पोलिस पाटील विनायक प्रभु यांनी स्थानिक रहिवाशी महेश कोरगांवकर यांच्या होडीतून बागवाडीमध्ये जाऊन पुरस्थीतीची पाहणी केली आणि रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे , मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंग्रे, तलाठी निलम सावंत , पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर , विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, ग्रामसेवक पी. आर. निकम, सरपंच विशाखा काळसेकर, चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री. एस. एस. चव्हाण, आरोग्य सहाय्यीका वाय. एस. सावंत, गौरी कसालकर, समुदाय आरोग्य अधिकारी डी. डी. शेवडे, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल टी. जी. मोरे, सिध्देश चिपकर, पोलीस पाटील विनायक प्रभु, कोतवाल प्रसाद चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण भाटकर, सावंत यांच्या सह निवृत्त पोलीस कर्मचारी वालावलकर यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page