जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या..
सिंधुदुर्गनगरी -ता ८
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवूनही अद्याप आदेश दिले नाहीत. आंतर जिल्हा बदली प्राप्त शिक्षकांनाही अद्याप कार्य मुक्त केले नाही. वेळोवेळी लक्ष वेधूनही शिक्षकांच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या अन्याया विरोधात दाद मागण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद समोर आज धरणे आंदोलन छेडण्यात आले. विविध घोषणा देत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून आदेश देऊन जिल्हा अंतर्गत बदलीची संधी दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बदल्यांसाठी २१ मे रोजी समुपदेशन प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेत काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. मात्र अद्यापही या बाबत आदेश न झाल्याने व अन्य विविध मागण्यांसाठी शिक्षकांना भर पावसात आंदोलन छेडावे लागत आहे, याबाबत शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी दुपारनंतर शिक्षक संघाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, कार्याध्यक्ष मधुसूदन घोडे, पूनम पालव, श्रावणी सावंत, के टी चव्हाण, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सिंधुदूर्ग जिल्हा परिषद प्रशासनाचे विविध मागण्याकडे लक्ष वेधले आहेत.
- प्रमुख मागण्या जिल्हा अंतर्गत बदली आदेश २१ जून २०२३ ची कार्यवाही तातडीने करा, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदोन्नती तातडीने करा, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करा, गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांना नियुक्तीपत्र दया व वेतन श्रेणी लागू करा, शून्य पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांची समायोजन करून बदली करा. नवीन शिक्षकांना नेमणुका द्या, प्रलंबित कामाचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करा. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन शिक्षकांवर अन्याय करत आहे. यापुढे अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने प्रशासनास दिला आहे.
