कुंभारमाठ येथे सुमोच्या धडकेत मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार…

⚡मालवण ता.११-:
मालवण कुंभारमाठ येथे टाटा सुमो गाडीने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन नारायण राठोड (रा. मालवण) हा २५ वर्षीय युवक जागीच मयत झाला. काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी सुमो चालक देवप्पा श्रीमंत करपे (वय २५, रा. विजापूर कर्नाटक) याच्यावर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मयत सचिन राठोड याचा भाऊ किरण नामदेव राठोड याने मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल मार्गावर कुंभारमाठ येथे म्हाडा कॉलनी तिठ्यावर भरधाव वेगात येणाऱ्या टाटा सुमो (MH-08-Z- 8010) या गाडीने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मोटारसायकलस्वार सचिन राठोड याला जोरदार धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळून डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर सुमो चालक देवप्पा करपे हा दारू पिऊन भरधाव वेगात गाडी चालवून मोटरसायकलला धडक दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

फिर्यादीनुसार सुमो चालक देवप्पा करपे याच्यावर सचिन राठोड याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम १०६, १२५ (a), १२५ (b), २८१, मोटर वाहन कायदा कलम १८४, १८५ अन्वये मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्री. खाडे हे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page