विधानसभेत आम. वैभव नाईक यांनी वेधले मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे लक्ष..
⚡मालवण ता.०३-: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी अनधिकृत एल.ई.डी. व पर्ससीन नेट मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधानसभागृहामध्ये राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. या अनधिकृत मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमारी संकटात आली असून याबाबत पारंपारिक मच्छिमार संघटनानी लक्ष वेधूनही शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत पर्ससीन व एलईडी मासेमारीवर शासन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून कारवाई करणार का ? असा सवाल आम. नाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना विचारला.
दरम्यान, आम. नाईक यांच्या या प्रश्नावर मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला गस्ती साठी जुलै अखेरपर्यंत स्पीड बोट देणार तसेच अवैध मच्छिमारी रोखण्यासाठी जिल्ह्यातील बंदरांवर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेरे लावणार असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात अनधिकृतपणे सुरु असलेल्या पर्ससीन व एलईडी लाईट मासेमारी विरोधात पारंपारिक मच्छिमार लढा देत असताना याबाबत आज आम. वैभव नाईक यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडून आवाज उठवीला. जानेवारी ते मे या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात एल.ई.डी. व पर्ससीन नेट मासेमारीवर बंदी लागू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड समुद्रामध्ये रात्री बिनधास्तपणे अवैध मासेमारी चालू असते. पारंपारिक मच्छीमार अशा एल.ई.डी. पर्ससीन नेट धारकांना जाब विचारायला गेले असता भर समुद्रात त्यांच्या नौकांवर चाल करून पारंपारिक मच्छीमारांमध्ये दहशत पसरवतात. अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्याकरता नेमलेल्या सागरी सुरक्षांवर देखील या एलईडी नौका धारक मच्छीमारांकडून हल्ले केले जातात. ही अवैध मच्छीमारी रोखण्याकरिता वारंवार मागणी केलेली स्पीड बोट कधी उपलब्ध करून देणार ? जिल्ह्यातील बंदरांवर सीसीटीव्ही बसवणार का? मासेमारी कालावधी संपल्यानंतर बंदरांवरून ज्यावेळी जनरेटर वाहतूक केली जाते त्याचवेळी जर या मच्छीमारांना पकडले तर सदर अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना अटक करता येऊ शकते. यामुळे शासन कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार का? असे प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी सभागृहामध्ये मत्स्यव्यवसाय मंत्री यांना विचारले.
आम. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एलईडी व पर्ससीनधारक मच्छीमारांची अरेरावी रोखण्याकरिता पोलिसांची मदत घेऊन किंवा या पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार देऊन या संदर्भात पोलिसांना सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले. तसेच अवैध मासेमारी करताना पकडलेल्या मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या दंडाचे स्वरूप बदलून आर्थिक स्वरूपातील दंडासोबतच अन्य कठोर शिक्षेचे बदल देखील केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. अवैध मासेमारीच्या आर्थिक दंडा मधून पारंपारिक मच्छीमारांना प्रोत्साहन पर बक्षीस देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परराज्यातील एलईडी व पर्ससीन नेट मासेमारी संदर्भात केंद्राच्या तटरक्षक दलाची मदत घेऊन सोबत केंद्राच्या अन्य यंत्रणांची मदत घेणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
