निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि नागरिकांमधून दुवा बनावे…

पोलीस अधीक्षक अग्रवाल यांचे आवाहन..

ओरोस ता.०१-:

पोलीस दलात कार्यरत असताना अनेक बंधने असतात. मात्र निवृत्तीनंतर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य मिळते. परंतु पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पोलीस दल व नागरीक यांच्यातील एक दुवा म्हणून काम करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सोमवारी दोन निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना केले.


सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले नंदकुमार शेटये व रूमिंग डिसोजा या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीच्या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक भवनात त्यांच्या कुटुंबियांसोबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सिंधू नगरी पोलीस ठाण्याचे मनीष कोलटकर तसेच निवृत्त पोलीस अधिकारी उमाकांत पालव आदी उपस्थित होते.
नंदकुमार शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व ३४ वर्षे सेवा बजावताना पोलीस दलात आलेले अनुभव सांगितले. शेवटी ते भावनिक झाले होते. रोमिंग डिसोजा यांनीही आपले पोलीस दलातील काम व त्याबाबतचे अनुभव सांगितले. आपण प्रामाणिक सेवा बजावली त्याचा आनंद अधिक आहे असे ते म्हणाले. या निवृत्त झालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार व निरोपाचा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला. व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page