ड्रेनेजच्या पाण्यामुळे तलावाची दुरवस्था; संजू परब यांचा सत्ताधारी-प्रशासनावर निशाणा..

सावंतवाडी, ता. १९ : शहराच्या वैभवात भर घालणारा मोती तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून, तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नगरपालिकेच्या बैठकीत तसेच पत्रव्यवहाराद्वारे याकडे लक्ष वेधत असतानाही सत्ताधारी आणि प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी केला.
मोती तलावात येणारे ड्रेनेजचे पाणी तातडीने बंद करण्याची मागणीही परब यांनी केली आहे. ते म्हणाले की, पूर्वी याच मोती तलावात पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. तलावाच्या पाण्यामुळे नागरिकांना आकर्षण होते. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली असून तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे मोती तलावाच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रामेश्वर प्लाझा तसेच सालईवाडा परिसरातील काही इमारतींचे सांडपाणी तलावात सोडले जात असल्याचा आरोप परब यांनी केला. मिलाग्रीस शाळेच्या दिशेने येणाऱ्या ओहोळातूनही मोठ्या प्रमाणात घाण तलावात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत नगरपालिकेच्या प्रशासनाचे लक्ष वेधूनही केवळ नोटिसा बजावल्याचे उत्तर दिले जाते. प्रत्यक्षात प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचे परब यांनी नमूद केले.
मोती तलावाच्या प्रदूषणाकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचेही अपेक्षित लक्ष नसल्याचे सांगत, या विभागाकडूनही याबाबत कमी पडत असल्याची टीका त्यांनी केली.
“मोती तलाव हा शेवटच्या घटका मोजत आहे. केवळ नोटिसा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तलावात येणारे सांडपाणी कायमस्वरूपी बंद करून तलावाच्या स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे परब यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोती तलावाच्या संवर्धनासाठी आपण माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तलावाचे पाणी स्वच्छ करून त्याचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
