⚡मालवण ता.०१-: मालवण येथील आदर्श संगीत विद्यालयाची वनभोजन सहल ओझर येथील श्री ब्रह्मानंद स्वामी मठाच्या निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाली. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद लुटतानाच स्वच्छता मोहीम राबवित मठाचा परिसर स्वच्छ केला. तसेच यावेळी विद्यालयाच्या वतीने मठाच्या परिसरात सदा चुरी यांच्या हस्ते कदंब वृक्षाचे रोप लावून वृक्षारोपणही करण्यात आले.
संगीत अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना निसर्गाशी देखील एकरूप होऊन आनंद लुटता यावा, या दृष्टीने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे तबलावादन शिक्षक सुधीर गोसावी यांच्या नियोजनाखाली ही सहल संपन्न झाली. यासाठी पालकांचेही सहकार्य लाभले. यावेळी सुधीर गोसावी यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक मंगेश कदम, विजय बोवलेकर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
