सीओ-इंजिनियर बिल्डरला पाठीशी घालताहेत का..?:मनसेच्या कुणाल किनळेकर यांचा सवाल..
⚡कुडाळ ता.०१-: संत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी कुडाळ नगर पंचायत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मुख्याधिकारी संबंधित बिल्डरला पाठीशी घालताहेत का असा सवाल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, संत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी मोठ्या प्रमाणात पाणी साचून सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासावर मनसेने सर्व प्रथम आवाज उठवल्यानंतर कुडाळ नगरपंचायतच्या सर्वच्या सर्व १७ नगरसेवकांनी सदर अतिक्रमण प्रश्नी लेखी आक्षेप घेतला. असे असताना सुद्धा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नाल्या बाबत आपल्या हित संबंधासाठी चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस पाठीशी घालत आहेत. सर्वांच्या तक्रारी नंतर नगरपंचायत प्रशासनाची भुमिका नेमकी काय याच्यावर कुडाळवासियांचे लक्ष असताना मात्र मुख्याधिकारी आणि नगरपंचायत इंजिनिअर शांत बसून आहेत.
मुख्याधिकारी यांनी एकतर बिल्डर ने केलेले अतिक्रमण बरोबर आहे असं सांगावे अथवा पाणी साचून होणारा त्रासा बाबतच्या आमच्या तक्रारी/आक्षेप चुकिचे आहेत असं तरी सांगाव. काय तरी एक भुमिका घ्यावी याबाबत सतत पाठपुरावा करुन देखील याबाबत प्रशासन कोणत्याही प्रकारची बाजु सांगत नाही. आचारसंहिता तसेच इतर कारणे देत आज उद्या करुन दिवस ढकलण्याचे काम सुरू आहे. प्रशासनानेच आपली भुमिका लेखी स्वरुपात न दिल्यास नगरपंचायत मधेच ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल .अशाच प्रकारे कुडाळ नगरपंचायत मार्फत बिल्डरांना शहरात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य परवानग्या दिल्यामुळे तेथील रहिवासांना फार मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे. त्याची तक्रार सोसायटी रहिवाशांनी करून सुद्धा हे नगरपंचायतचे अधिकारी त्याच बिल्डरांना कोणतीही कारवाई न करता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नव्याने परवानगी देत आहेत. याबाबत सुद्धा सविस्तर माहिती घेऊन मनसे स्टाइल आंदोलनाचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.
