जय भवानी जहाज मालवण समुद्रात दाखल
मालवण (प्रतिनिधी) भारत सरकारच्या केंद्रीय सागरी मत्स्यपालन संस्था मुंबई तर्फे सागरी किनारी भागातील सागरी सस्तन प्राण्यांचा सर्व्हे करण्यात येत आहे. हा सर्व्हे करण्यासाठी या संस्थेने नियुक्त केलेले ‘जय भवानी’ हे जहाज बुधवारी सायंकाळी मालवणात दाखल झाले. सदर जहाज महाराष्ट्रातील सातपाटी ते आरोंदा या सागरी भागातील बारा सागरी मैल अंतरातील ठराविक लँडिग पॉईंट आणि बंदरांच्या ठिकाणी तेथील सस्तन प्राण्यांचे आणि समुद्राच्या पाण्याचे नमुने गोळा करणार आहे. या संदर्भात सागरी सुरक्षेसंबंधित सर्व विभागांना सहकार्य करण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, हे जहाज मालवणात आले त्यावेळी हे जहाज म्हणजे मत्स्य विभागाने पकडलेला परराज्यातील ट्रॉलर असावा, असे स्थानिक मच्छीमारांना वाटले. परंतु प्रशासकीय यंत्रणेकडे याबाबत खातरजमा केली असता सदरी जहाज हे संशोधनासाठी आल्याचे स्पष्ट झाले.
