महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे यांची माहिती..
वैभववाडी प्रतिनिधी
दरमहा महिलांच्या बँक खात्यात दीड हजार जमा होणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना वैभववाडी तालुक्यात लाभार्थी महीला पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा महीला पदाधिकारी कटिबद्ध आहोत. महायुती सरकारने महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना व सवलती जाहीर केल्या आहेत. याचा लाभ प्रत्येक महिलांनी घेतला पाहिजे. या सर्व योजनांची गावागावात जनजागृती करण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. अशी माहिती वैभववाडी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा प्राची तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैभववाडी भाजपा कार्यालय येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती स्नेहलता चोरगे, महिला पदाधिकारी सीमा नानिवडेकर, नगरसेविका संगीता चव्हाण, सुंदरा निकम, यामिनी वळवी व महिला उपस्थित होत्या.
माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी महिलांपर्यंत पोचून शासनाच्या योजनांचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत असे तावडे यांनी सांगितले.
ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशा प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
महायुती सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री श्री अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे आभार मानत असल्याचे माहीती प्राची तावडे यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत या सह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून योजना प्रभावीपणे राबवली जाईल असे सौ. तावडे यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये देण्यात येणार. आणि या योजनेसाठी सरकारकडून 46000 कोटी रुपयांचा भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
महायुती सरकार वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देणारी अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सहा लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून त्यांची संख्या सात लाखांपर्यंत वाढवण्यात येणार. महिला उद्योजकांसाठी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुद्धा सुरू करणार असल्याचं सरकारने सांगितले आहे. महिला व बालकां विरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलद गती न्यायालयांना आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यादेखील योजना सुरु केल्या. महिलांसाठी विशेष योजना राबवणा-या महायुती सरकारचे सौ. तावडे यांनी आभार व्यक्त केले.
