मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर: वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी…
मालवण दि प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज हे देशात नाही तर जगात असे एकमेव राजा होते कि ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच सामाजिक चळवळीचा पाया म्हणजेच महात्मा फुले, त्याच्या भिंती म्हणजे शाहू महाराज आणि त्याचा कळस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत. त्यामुळे थोर व्यक्तींचा आदर्श घेऊन जर आपण जीवनात वाटचाल केली तर आपले जीवन सुखकारक ठरेल असे प्रतिपादन मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुहास हिंदळेकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सौ. शुभदा शिंदोळकर, श्री. श्रीनाथ फणसेकर, संभाजी कोरे, रामचंद्र गोसावी, प्रवीण कुबल, सौ. मिताली मोंडकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी श्री. संभाजी कोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. हिंदळेकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. तर श्री. फणसेकर, श्री. कुबल तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींची राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर समयोचित भाषणे झाली. शेवटी श्री. कोरे यांनी आभार मानले.
