पाडलोस, मडुऱ्यातील मोरीपुल धोकादायक…

*💫बांदा दि.०१-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस कृषी विद्यापीठ व मडुरा आयना जवळ असलेल्या मोरीपुलाचा संरक्षक कठडा तुटून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अशा धोकादायक मोरी पुलांवर अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा सवालही मडुरा पंचक्रोशीतून होत आहे. आमदार, खासदारांसह जिल्ह्या प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस व मडुरा गावातून ये-जा करतात. परंतु धोकादायक झालेल्या मोरी पुलांकडे कुणाचेही लक्ष जात नसल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही ठिकाणच्या संरक्षक कठड्यांचे दोन तुकडे झाल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार वर्षापूर्वी मडुरा आयनाजवळ असलेल्या प्रवण क्षेत्रावरील मोरीपुलावर अपघात घडला होता. याची दखल प्रशासनाने घेऊन होणारे अपघात टाळण्यासाठी सदर पुलांची दुरूस्ती करण्याची मागणी मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे. दोन वर्षांपूर्वी पाडलोस ग्रामसभेत येथील मोरीपुलाचा प्रश्न तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी उपस्थित केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाची दुरूस्ती करण्याची मागणीही श्री.कुबल यांनी केली होती. दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटूनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने श्री.कुबल यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. तसेच अपघात घडण्यापूर्वी तरी अधिकाऱ्यांनी डोळे उघडावे आणि पुलाची दुरूस्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page