नृत्य परिषदेतर्फे ‘लाखाची’ नृत्यस्पर्धा…

सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन:जिल्हा, विभाग आणि अंतिम फेरीत रंगणार स्पर्धा;सिंधुदुर्गसाठीची प्राथमिक फेरी जुलै मध्ये..

⚡कुडाळ ता.१४-: नृत्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन आयोजित करण्यात आली आहे. अंतिम विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ५० हजार आणि २५ हजार अशी रोख पारितोषिके त्याच बरोबर ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र अशी भव्य बक्षिसे असणार आहेत. जिल्हा, विभाग आणि अंतिम फेरी अशा टप्प्यात आणि लहान व मोठा अशा दोन गटात हि स्पर्धा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयासाठीची प्राथमिक जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली असून त्या विषयी आणि संपूर्ण स्पर्धेच्या स्वरूपाविषयी नृत्य परिषद महाराष्ट्राचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राहुल कदम आणि कुडाळ तालुका अध्यक्ष भूषण बाक्रे यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा सचिव रोहित माने, तालुका खजिनदार सौ. अदिती दळवी, कोरिओग्राफर तुशांत सोनवणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहुल कदम म्हणाले, नृत्य परिषद महाराष्ट्र आयोजित ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन आहे. महाराष्ट्र डान्स प्रीमियर लीग म्हणजेच MDPL या नावाने हि स्पर्धा ओळखली जाणार आहे. जिल्हास्तर, विभाग स्तर आणि अंतिम फेरी अशा टप्प्यात हि स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी २५ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यामध्ये होणार असून त्यासाठी पवन टाक, वैष्णवी पाटील, शिवम वानखेडे, ऋतुजा जुन्नरकर, दीपक हरसुरे आणि श्वेता परदेशी असे नृत्य क्षेत्रातील सेलिब्रेटी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही संपूर्ण स्पर्धा लहान आणि मोठ्या गटामध्ये होणार आहे. सुरुवातीला जिल्हास्तरावर प्राथमिक फेरी होतील. त्यातून दोन्ही गटातून प्रत्येकी तीन विजेते काढले जातील. त्या विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येईल. जिल्हा स्तरावरचे सहा विजेते विभाग स्तरावर सहभागी होतील. हि उपांत्य फेरी असेल. एकूण सहा विभागातुन दोन्ही गटातून ३६ विजेते निवडले जातील. या सर्व विजेत्यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र डान्स प्रीमियर लीगची महाअंतिम फेरी २५ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यात होणार आहे. त्यात विभाग स्तरावरचे ३६ स्पर्धक सहभागी होणार आहेत. यातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये १ लाख, ५० हजार आणि २५ हजार तसेच ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. .
या स्पर्धेच्या जिल्हास्तर फेरीसाठी नावनोंदणी सुरु झाली असून स्पर्धकांनी फॉर्म भरून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रु. ५९०/- प्रवेश फी असून ती एकदाच जिल्हास्तर फेरीच्या वेळी ऑनलाईन भरायची आहे. विभाग आणि अंतिम फेरीसाठी प्रवेश फी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्राथमिक फेरी जुलै महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तर विभाग स्तरीय फेरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्याचे ठिकाण आणि वेळ स्पर्धकांना कळविले जाणार आहे. स्पर्धेविषयक अधिक माहिती आणि नियम यासाठी 8600143061 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राहुल कदम, भूषण बाक्रे, रोहित माने, अदिती दळवी आणि नृत्य परिषद महाराष्ट्र-सिंधुदुर्ग यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page