पत्रकार भवनात सोलर पॅनल वीज यंत्रणा उभारणीसाठी २० लाखांचा निधी ; जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश..
⚡ओरोस ता १२-: सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहे.त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख २८ हजार ६१५ रुपये सोलर पॅनल बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅन्टींग साठी सातत्याने जिल्हा पत्रकार संघाने पाठपुरावा केल्याने एकूण ४७ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.आता पत्रकारांनी पर्यावरणाचा संदेश देत सोलर पॅनल बसवत एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे पत्रकार भवनातील या सोलर पॅनलमुळे वीज बिल मुक्ती मिळून व्यवस्थापन खर्च कमी होईल, अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली.
पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनामध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर उर्वरित कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तातडीने जिल्हा नियोजनच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर भवनाच्या इमारतीवर सोलर पॅनल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधून या इमारतीमध्ये कॅन्टीन उभारण्यासाठी १८ लाखाचा निधी देखील समितीमधून देण्यात आला असून लवकरच कार्यारंभ आदेश मिळणार आहे. या सभागृहांमध्ये पत्रकार सभासदांच्या सूचना आल्यानंतर तातडीने टॉवर एसी मागणी जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन तातडीने ६ टॉवर एसी मंजूर करण्यात आले असून त्यासाठी ९ लाख ४० हजार ९१८ रुपये निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार सघाने सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅन्टींगसाठी सातत्याने पाठपुरावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा.नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आ.नितेश राणे आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे केला होता. त्यामुळे तब्बल ४७ लाखाचा निधी मंजूर झाला असून कामे पूर्णत्वास जात आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे व श्री. पवार व बांधकाम कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचेही चांगले सहकार्य मिळाले. जिल्हा नियोजन मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा.नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खा.विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आभार मानत असल्याचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी सांगितले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर बसविण्यात आलेले पर्यावरण पूरक सोलर पॅनल
