⚡बांदा, ता.१०-:
बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराचा मृगाच्या पालखीचा सोहळा शुक्रवार ७ जुन रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. बांदेश्वर भक्तांच्या गर्दीत वाजत गाजत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली.या पालखीला वरुण राजाने सरी बरसवून आपली उपस्थिती दर्शवीली.
दरवर्षी श्री बांदेश्वराच्या जत्रोत्सवापासून हा पालखी सोहळा प्रारंभ होतो. त्यानंतर दर सोमवारी मंदिराभोवती ही सवाद्य पालखी प्रदक्षिणा होते. यावेळी मंगलमय वातावरणात भाविक अभंग गायन करतात. त्यानंतर पालखीचे मंदिरात आगमन होऊन आरती व शिवनामाचा गजर केला जातो. हा सोहळा मृग नक्षत्रापर्यंत म्हणजेच मिरगापर्यंत दर सोमवारी सुरु असतो. मिरगाच्या पालखीने या सोहळ्याची सांगत होते. शुक्रवारी 7 रोजी ही मिरगाची पालखी झाली. दरवर्षीप्रमाणे मिरगानिमित्त मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. निलेश महाजन यांनी सपत्निक पुजन केले. रात्री ९ वाजता पालखी सोहळा प्रारंभ झाला. मोठ्या भक्तीमय वातावरणात ही पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर मंदिरात पालखीचे आगमन होताच भजन व महाआरती करण्यात आली. जय बांदेश्वर जय बांदेश्वर गजर गर्जत, पालखी चाले जत्रेपासून मिरगापर्यंत
‘शिवशिव शिव शिव सांब सदाशिव… हर हर हर हर सांब सदाशिव’ अशा विविध गजरात भाविक दंग झाले. आरती नंतर मानकरी सगुणदादा सावंत यांनी सर्वांच्या कल्याणासाठी घातले. त्यानंतर साकडे तीर्थप्रसाद वाटण्यात आला. मिरगाची पालखी झाल्यानंतर सोमवार पासुन दर सोमवारी मंदिरात रात्री ८ ते ९ या वेळेत भजनसेवेला आरंभ झाला आहे.
