⚡कणकवली ता.०२-: कणकवली आगारातील एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कामगार सेनेचे कोकण विभागीय सचिव भगवान उर्फ आबा धुरी व तालुकाप्रमुख वैभव मालंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड व बसस्थानक प्रमुख प्रदीप परब यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
ड्युट्या लावताना कर्मचार्यांमध्ये भेदभाव केला जात असल्याची बाब एसटीच्या अधिकार्यांना निदर्शनास आणून दिली. कमी बेसिकाचे चालक व वाहक ओव्हर टाईमच्या ड्युटीला जायला तयार असतानाही त्यांना ओव्हर टाईमच्या ड्युट्या लावल्या जात नाहीत. काही मार्जितील चालक व वाहकांनाच ड्युटी लावली जाते, असा आरोप धुरी व मालंडकर यांनी केला. ज्येष्ठ चालक व वाहकांकारिता पूर्वीप्रमाणे ग्रुप असावा, ग्रुपमधील बोरवलीसारख्या हंगामी चालणार्या बसेस ग्रुपमधून बाहेर काढव्यात. आलोकेशनवाल्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली यासह अन्य तक्रारींचा पाढाच वाचला. कामगारांच्या प्रश्नांबाबत स्थानकप्रमुख व सहाय्यक वाहतूक निरीक्षक शिष्टमंडळाने चर्चा केली. महेश कोदे, तेली, तारी, हारे, गिते अन्य कर्मचारी उपस्थित होते.
