श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयाचा उपक्रम:जेनेरिक औषध विक्री, साठा व्यवस्थापन आणि व्यवसायातील संधींची घेतली माहिती..

⚡कुडाळ ता.२१-: ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जेनेरिक औषध विक्रीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी दोडामार्ग येथील सिद्धिविनायक जनआरोग्यम् जेनेरिक मेडिकल स्टोअरला शैक्षणिक अभ्यास भेट दिली. जनआरोग्यम् जेनेरिक प्रायव्हेट लिमिटेडच्या या मेडिकल स्टोअरमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली.
अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आयोजित या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना रिटेल फार्मसी व्यवसाय, औषध वितरण, साठा व्यवस्थापन आणि औषधविक्रीसंदर्भातील कायदेशीर नियमांची माहिती देण्यात आली. ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधांचे महत्त्व, त्यांची किफायतशीर किंमत आणि रुग्णांना होणारा आर्थिक फायदा याबाबतही चर्चा करण्यात आली.
औषधांच्या साठ्याचे व्यवस्थापन, कालबाह्य औषधांवरील नियंत्रण आणि इन्सुलिन, लसी यांसारख्या संवेदनशील औषधांसाठी आवश्यक असलेल्या शीतसाखळी व्यवस्थापनाची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी समजून घेतली. तसेच डॉक्टरांच्या औषधपत्रिकेची अचूक पडताळणी, रुग्णांना औषधांविषयी योग्य मार्गदर्शन आणि जेनेरिक औषधांबाबत ग्राहकांचा विश्वास वाढविण्यात फार्मासिस्टची भूमिका याविषयी प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.
फार्मसीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा मेडिकल स्टोअर किंवा फ्रँचायझी सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल, अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) परवाने, व्यवसाय व्यवस्थापन आणि रोजगाराच्या उपलब्ध संधी याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या अभ्यास भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच रिटेल फार्मसी व्यवसायातील प्रत्यक्ष कामकाज, आव्हाने आणि भविष्यातील व्यावसायिक संधींची माहिती मिळाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
