मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन:नगरपालिकेच्यावतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार..
⚡मालवण ता.३०-: आज मालवण शहरातील मुलांनी दहावी परीक्षेत मिळविलेल्या यशासाठी ही मुले कौतुकास पात्र आहेत. या यशामागे मुलांचा अभ्यास, मेहनत, शिस्त असून शिक्षक व पालकांचेही मोठे योगदान आहेच हे खरे असले तरी या परीक्षांच्या गुणांवर आपले यश हे अवलंबून न ठेवता मिळालेली संधी आणि त्याची उपयुक्तता या दोहोंचा वापर करून विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीचे शिखर गाठावे असे प्रतिपादन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी येथे बोलताना केले.
मालवण नगरपालिकेतर्फे मालवण शहरातील शाळांमधील दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नगरपालिकेच्या सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते नितीन वाळके आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रत्येक शाळेतून दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रफुल्ल देसाई म्हणाले, पूर्वी दहावीची परीक्षा म्हणजे अडथळ्यांची शर्यत होती.. मात्र आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.. दहावीच्या निकालातून विद्यार्थ्यांसमोर पुढील वाटा निर्माण होतात, यातील योग्य वाट पकडून विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी. आपल्याला काय बनायचे आहे याचा योग्य विचार व आराखडा तयार केला पाहिजे. आज पालक विद्यार्थ्यांबाबत जास्त जागरूक बनले आहेत. विद्यार्थ्यांनीही जागरूक होऊन पुढील वाटचाल करावी. आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यात आयएएस, आयपीएस अधिकारी निर्माण होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. तर नितीन वाळके यांनी आज विद्यार्थी शैक्षणिक जीवनात जास्त व्यस्त असल्याचे दिसून येते. म्हणूनच आज मैदाने ओस पडलेली दिसून येतात. याला विद्यार्थ्यांपेक्षा पालक जास्त जबाबदार आहेत. पालक त्यांच्या जीवनात खुल्या शैक्षणिक वातावरणात जगले. मात्र आज तशी परिस्थिती दिसत नाही. पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलांमधील कौशल्य ओळखून त्यांदृष्टीने पुढे जाण्यास त्यांना प्रोत्साहन द्यावे, आजच्या गुणांपेक्षा पुढील जीवनाचा संघर्ष मुले कशी करतात हे जास्त महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेमराज सावंत यांनी केले. यावेळी मालवणचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, शिक्षक देविदास वेरलकर, श्री. परब, प्रसन्नकुमार मयेकर, भंडारी हायस्कूल चे शिक्षक संदीप अवसरे यांच्यासह पालक, विद्यार्थी व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
