आनंदव्हाळ येथे भरधाव मोटरसायकलची एसटी बसला धडक…

⚡मालवण ता.१६-: मालवण- कसाल हमरस्त्यावरील आनंदव्हाळ येथे काल बुधवारी रात्री भरधाव मोटारसायकलने एसटी बसला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मालवण कसाल मार्गावर आनंदव्हाळ भगवती हॉटेल नजीक वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी मालवण (एमएच 20 बीएल 3185) या बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकल (एमएच 07 एक्यू 2568) ची धडक बसली. एसटी बसला एका बाजूला धडक देऊन मोटरसायकल रस्त्यावर कोसळली. मोटरसायकलवर बसलेले तिघेही जण रस्त्यावर कोसळले. अपघात घडताच एसटी चालक, वाहक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी धाव घेतली. रुग्णवाहिकेला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मालवण पोलीस व एसटी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघाताचा पंचनामा केला.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल चालक गणेश कृष्णा निकम (वय 30) रा. पोईप यांचा बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी राकेश पवार (वय 30) रा. कुंभारमाठ याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. तर सुनील शिवराम पवार (वय 25) रा. कोटकमटे ता. देवगड या जखमी तरुणावर गोवा येथे उपचार सूरू आहेत.

या अपघाताची नोंद मालवण पोलीस स्थानकात करण्यात आली असून भरधाव वेगात मोटरसायकल चालवून अपघातात स्वतःच्या मृत्यूस तसेच मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूस व मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page