राजकीय पक्षांकडून सामाजिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष…

बाबासाहेब नदाफ यांनी व्यक्त केली खंत ः गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकासाचे शिबीर..

⚡कणकवली ता.१४- : राष्ट्र सेवा दलातर्फे विद्यार्थ्यांसाठी वर्षाला देशभरात विविध ठिकाणी 100 हून अधिक व्यक्तिमत्व शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणला जातो. शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिकवाद, राष्ट्रवाद यासह समाजहिताचे संस्कार रुजवले जात आहेत. देशातील युवा पिढीच्या हाती रोजगार नाही. परिणामी युवा पिढी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटात युवा पिढी अडकल्यामुळे देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीयसह अन्य प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी ही पिढी पुढे सरसावताना दिसत नाही. सत्तेच्या राजकारणापायी राजकीय पक्ष सामाजिक व देशहिताच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशी खंत राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी व्यक्त केली.
अद्वैत फाऊंडेशन व राष्ट्र सेवा दलाच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रामात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात नदाफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजन चव्हाण, सरिता पवार उपस्थित होत्या. नदाफ म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदूस्थान सेवा दल कार्यरत होता. स्वातंत्र्यानंतर या दलात दोन गट पडले. यातून काँग्रेस सेवा दल व राष्ट्रीय सेवा दल या दोन दलाचीनिर्मिती झाली. राष्ट्र सेवा दल राष्ट्रसेवा व समाजहिताला प्राधान्य देणारी संघटना आहे. या संघटनेवर समाजवादी विचारसरणीचा पडगा आहे, असे त्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात समाजात विषमता वाढत असून ही विषमता समाज व देशासाठी घातक आहे. ही विषमता दूर करण्याचे कार्य राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे सुरु आहे. लोकशाही, राष्ट्रहित, वैज्ञानिकता, धर्मनिरपेक्षता यासह देश व समाजहिताच्या कार्यात राष्ट्र सेवा दलाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे, असे ते म्हणाले.
राज्यकर्त्यांना सत्तेची धुंद चढली आहे. त्यामुळे देश व समाजाचे मोठे नुकसान होत आहे. सत्तेच्या धुंदीपायी राज्यकर्त्यांना देश व समाजहिताचे भान राहिलेले नाही. या धुंदीमुळे पक्ष व संघटनांच्या माध्यमातून कार्यकर्ते घडविण्याच्या प्रक्रियेला अलीकडच्या काळात ब्रेक लागला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बॉक्स
मोदी सरकार व भाजप लोकशाही व संविधानविरोधी
केंद्रातील मोदी सरकार व भाजप लोकशाही व संविधान विरोधी आहे. हे सरकार भांडवलीशाही व उद्योजकांसाठी काम करीत आहे. त्यामुळे या सरकारला शेतकरी व सर्वसामान्यांचे देणेघेणे राहिलेले नाही. भाजपकडून जाती-जातीत व धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. त्यामुळे राष्ट्र सेवा दलाने केंद्रातील मोदी व भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही व संविधानविरोधी मोदी सरकारचा पराभव होऊन देशात लोकशाही व संविधानाचे जतन करणारे सरकार येईल, असा विश्‍वास बाबासाहेब नदाफ यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page