⚡देवगड ता.१४-: समुद्रात मासेमारी करताना अथवा जलवाहतुकीदरम्यान प्लास्टिकच्या बाटल्या,पिशव्या असे अनेक घटक पाण्यात टाकले जातात. काही वेळा नौकांमधून तेल (ऑईल) गळतीही होत असते. ऑईल गळतीमुळे पाण्यावर तवंग निर्माण होतो व त्या भागातील माशांना ऑक्सिजन मिळत नाही. त्याचा परिणाम मत्स्य उत्पत्तीवर होतो. एका सर्व्हेनुसार समुद्रातील जलप्राण्यांच्या पोटात प्लास्टिकचे घटक आढळून आले आहेत. ही बाब गंभीर आहे. समुद्र आपल्याला मत्स्योत्पादन
देत असतो.बदल्यात प्लास्टिक कचरा किंवा जलप्रदूषण करून समुद्राला दुषित करू नका,असे आवाहन जिल्हा मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी देवगड येथे केले.
मत्स्य पालन विभाग, मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयामार्फत कार्यरत असलेल्या भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेच्या मुंबई बेसतर्फे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाच्या सहाय्याने या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे पहिलेच जागरूकता अभियान देवगड येथे राबविण्यात आले.देवगड येथील देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभागृहात मंगळवारी 'सागरी प्लास्टिक कचरा जागरुकता अभियान' कार्यक्रम पार पडला.यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. देवानंद उईके, वरिष्ठ शास्त्रज्ञ सहाय्यक स्वप्नील शिर्के, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक बहर महाकाल, देवगडचे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, ज्येष्ठ संचालक नंदकुमार घाटे, तारामुंबरी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विनायक प्रभू,उपाध्यक्ष श्रीपाद पारकर ,
नॅशनल टास्क फोर्सच्या फोकल पॉईंट श्रीमती नितूकुमारी प्रसाद,आय ए एस असून मेंबर कन्वेनर डॉ जयभास्करन, डिजी,ए एस आय आदी उपस्थित होते.
आज समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य आहे. नौकांमधून तेल गळतीसारखे प्रदूषण होत आहे. यामुळे सागरी जीव धोक्यात आले आहेत. हे टिकवायचे असेल तर जलप्रदूषण रोखणे काळाची गरज आहे. सागरी कचरा कमी करण्याच्या उद्देशाने ‘ग्लोलिटर पार्टनरशिप प्रोजेक्ट’ राबविण्यात येत असून आपला भारत देश या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची ‘लीड एजन्सी’ म्हणून काम करीत आहे. त्याअनुषंगाने देशपातळीवर नॅशनल टास्क फोर्स स्थापित करण्यात आला असून या पोजेक्टच्या अंमलबजावणीसाठी भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था, मुंबईला मुख्य काम देण्यात आले असल्याची माहिती भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई बेसचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ मत्स्य वैज्ञानिक अशोक कदम यांनी येथे दिली.
श्री. कदम यांनी ग्लोलिटर पार्टनरशिप प्रोजेक्टबद्दल उपस्थित मच्छीमारांना माहिती दिली. ते म्हणाले, सागरी कचरा कमी करण्याच्या उद्देशाने हा एक प्रकल्प आहे. हा समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आहे. समुद्रात पाण्यामध्ये एका ठिकाणी हा प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साचून राहतो. मासेमारी करताना मच्छीमारांना अशाप्रकारचा प्लास्टिक कचरा समुद्रात दिसून आल्यास त्यांनी त्याची माहिती मत्स्य विभागाला द्यावी. जेणेकरून समुद्रातील ती जागा प्लास्टिक कचऱ्याचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करून तेथे उपाययोजना राबविण्याबाबत शासनाकडून प्रयत्न केले जातील. यासाठी मच्छीमार बांधवांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.
नंदकुमार घाटे म्हणाले, मत्स्य व्यवसायात होणारे बदल मच्छीमारांनी स्वीकारून मत्स्य व्यवसायात सुधारणे गरजेचे आहे. मच्छीमारांच्या उन्नतीसाठी येथील मच्छीमार संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मच्छीमार जगला, तरच मच्छीमार संस्था कार्यरत राहतील. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मच्छीमारांची एकजूट आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. पाळेकर म्हणाले, समुद्रातील प्लास्टिक मासेही खात असतात. हे मासे आपण खातो. त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम शक्य आहे. हे टाळण्यासाठी व समुद्रात प्लास्टीक कचरा होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळला गेला पाहिजे. शासनाने सर्वच प्लास्टिक घटकांवर बंदी घातली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. डॉ. देवानंद उईके, स्वप्नील शिर्के, बहर महाकाल आदींनी सागरी प्लास्टिक कचरा जागरुकता अभियानाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मच्छीमार दत्ताराम कोयंडे, जगन्नाथ कोयंडे, उमेश आंबेरकर, इलियास होलसेकर, पंढरीनाथ मणचेकर, सचिन कदम, पप्पू भिल्लारे, शामराव पाटील, जागृत जोशी यांच्यासह सागर रक्षक, सागर मित्र, मच्छीमार बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन डॉ. उईके यांनी, तर आभार स्वप्नील शिर्के यांनी मानले.
