मालवणात गोडकर्स आर्ट अकॅडमीचे उदघाटन..
⚡मालवण ता.१०-: सुप्रसिद्ध चित्रकार विनायक गोडकर यांच्या मालवण रेवतळे येथील गोडकर्स आर्ट अकॅडमीच्या वास्तूचे आज उदघाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अकॅडमीला भेट देऊन या अकॅडमीमुळे मालवण मधील विद्यार्थी व कलाप्रेमींना कला प्रशिक्षणाचे नवे दालन खुले झाले आहे, अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
प्रतिथयश चित्रकार विनायक गोडकर यांनी मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी मालवण रेवतळे येथे इमारत उभारून गोडकर्स आर्ट अकॅडमी सुरु केली आहे. या आर्ट अकॅडमीमुळे शालेय मुलांसह चित्रकलेची आवड असलेल्या तरुण व ज्येष्ठांनाही कला शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे. या अकॅडमीच्या उदघाटनाच्या निमित्ताने सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी संगीत कार्यक्रमही संपन्न झाला.
यावेळी मालवणातील कला क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अकॅडमीला भेट देऊन मालवणातील विद्यार्थी व कलेची आवड असलेल्या व्यक्तींना कलेचे धडे गिरवण्यासाठी चित्रकार विनायक गोडकर यांनी अकॅडमी मार्फत सुरु केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुलांमधील चित्रकलेला, कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी, त्यांच्यातील कलाकाराची प्रगती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याच उद्देशाने ही अकॅडमी सुरु करण्यात आली आहे, या अकॅडमी मध्ये शालेय मुलांसह चित्रकलेची आवड असलेले तरुण व ज्येष्ठ मंडळीही सहभागी होऊ शकतात, चित्रकलेचे सर्वांगीण शिक्षण अकॅडमीत देण्यात येणार आहे, दि. ११ मे पासून नियमित प्रशिक्षण वर्ग सुरु होणार आहेत, असे विनायक गोडकर यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी दिनकर (बबन) शेलटकर, शरद धुरी, समित कोळगे, प्रज्ञा कोळगे, पांडुरंग गोडकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
